सहपोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांचे मत
देशातील प्रत्येक मुलामध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासारखे कर्तृत्ववान होण्याची निश्चितच क्षमता आहे. मात्र त्यासाठी त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे मत सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण यांनी नुकतेच व्यक्त केले. येथील हिंदी भाषा एकता परिषदेच्या वतीने हिंदी दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील टीएमए सभागृहात आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
त्या वेळी हिंदी भाषा एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बी. एल. शर्मा, खासदार राजन विचारे, गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख गुरुमुख सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त शिक्षकांनी मुलांच्या गुणांची पारख करून त्यांना थोर महापुरुषांच्या कथांनी प्रेरित केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे, असे मतही लक्ष्मी नारायण यांनी व्यक्त केले. आपण देशाचे जागरूक नागरिक आहोत. आपण संघटित राहिलो तरच आपल्या देशाची एकता कायम राहील, पण त्याचबरोबर ही एकता मोडण्याची हिंमत कोणतीही आतंकवादी संघटना करू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात नारायण तिवारी (पत्रकारिता), सुरेश मिश्र (साहित्य), जैनम सिंघवी (कवी) या विभागातील पुरस्कार देण्यात आले. तसेच आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०१५चे पारितोषिक वितरण पार पडले. त्यामध्ये इयत्ता ९ वी व १०वी च्या विद्यार्थ्यांना मिसाइल माणसाचा प्रवास आणि जगात फोफावलेला आतंकवाद की दहशत हे विषय देण्यात आले होते.