ठाण्यात ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते आग्रही असताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी सादर केलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या करात तब्बल १० टक्क्य़ांची वाढ सुचवून सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड दिला. शहराला पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सक्षम बनवायचे असेल तर त्यासाठी करवाढीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करतानाच मोठय़ा  प्रकल्पांच्या उभारणीसाठी कर्जरोखे उभारण्याचेही जयस्वाल यांनी यावेळी जाहीर केले. विशेष म्हणजे, सन २०१८ पासून मालमत्ता कराची आकारणी भांडवली मूल्यावर आधारित कररचनेवर केली जाईल, व त्यासाठी आवश्यक तयारी आतापासूनच हाती घेतली जाईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेचा आगामी वर्षांचा अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त जयस्वाल यांनी महापौर मिनाक्षी िशदे यांना सादर केला. यावेळी करवाढीचा निर्णय घेत असताना ठाण्यातील जे मालमत्ताधारक संपूर्ण वर्षांचा मालमत्ता कर लवकरात लवकर भरतील अशांसाठी विशेष सवलत योजनाही आयुक्तांनी जाहीर केली. मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आलेली विकासकामे, तसेच स्मार्ट सिटी योजनेत झालेली ठाण्याची निवड त्यामुळे करवाढ करणे क्रमप्राप्त झाले असून व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे ठाण्यात वादग्रस्त ठरलेला कचरा कर रद्द करण्याचा प्रश्नच नाही, असेही जयस्वाल यावेळी म्हणाले.

अर्थसंकल्पात सुचविल्याप्रमाणे मालमत्ता कराच्या मूळ दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसली तरी या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या विविध करांमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार निवासी मालमत्तांसाठी जल-लाभकर १२ टक्क्य़ांवरुन २२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तांसाठी १७ टक्क्य़ांवरुन २७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलनि:सारण लाभ करात निवासी मालमत्तांसाठी १९ टक्के, बिगर निवासीसाठी २२ टक्के, मलनि:सारण करात पाच आणि १८ टक्के, रस्ता करात दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. या करवाढीत सर्वसाधारण करात कोणतीही वाढ सुचविण्यात आली नसल्याने ठाणेकरांवर मोठा आर्थिक भार पडणार नाही, असा दावा जयस्वाल यांनी केला. या वाढीच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षांला ४० कोटी रुपयांची वाढ अपेक्षीत धरण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

शहरातील वेगवेगळ्या भागांप्रमाणे दरवाढ बदलत जाणारी असली तरी नौपाडय़ातील एखाद्या मालमत्तेला सद्यस्थितीत ५०० रुपयांचा कर येत असेल तर नवीन दरानुसार त्यासाठी ६५० रुपयांपर्यत आकारणी होईल, असा अंदाज मालमत्ता कर विभागातील सूत्रांनी वर्तविला. यासंबंधीचे सविस्तर प्रस्ताव लवकरच सादर होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सवलत योजना

मालमत्ता करात वाढ करत असताना महापालिकेने ठाणेकरांसाठी सवलत योजनाही आखली आहे. त्यानुसार ३१ मे २०१७ पर्यत पूर्ण वर्षांचा मालमत्ता कर भरल्यास सामान्य करात तब्बल १० टक्क्य़ांची सूट दिली जाईल. ३० जून २०१७ पर्यत पूर्ण वर्षांचा मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, तर ३१ जुलैपर्यत भरला गेल्यास ३ टक्क्य़ांची सूट मिळेल. ३१ ऑगस्टपर्यत करभरणा करणाऱ्यांना २ टक्के इतकी सूट दिली जाणार आहे. एक एप्रिलपासून अपंग, माजी सैनिकांच्या मालमत्ता करातील सामान्य करात पाच टक्के सरसकट सूट दिली जाईल.

कर्जरोख्यांद्वारे निधीउभारणी

भांडवली कामांच्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार कर्जरोखे उभारून त्याद्वारे निधी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंबंधी केंद्र शासन स्तरावरील अर्थतज्ज्ञांच्या मदतीने सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असून लवकरच तो सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. तब्बल ५३५ कोटी रुपयांचा निधी याद्वारे उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.