ठाणे येथील राबोडी भागातील ३५ वर्षीय महिलेला खड्डय़ात पडून जीव गमवावा लागल्याच्या घटनेमुळे शहरातून संताप व्यक्त होत असतानाच सोमवारी तिच्या नातेवाईकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून या दुर्दैवी घटनेचा निषेध केला. या मोच्र्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका मुख्यालयात तसेच आयुक्त कार्यालयाबाहेर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्यामुळे मोर्चेकर अधिक आक्रमक झाले आणि पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले. यामुळे मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर काही राजकीय नेत्यांनी मोर्चेकरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी भेट घालून दिली. महिलेच्या मृत्युप्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात येत असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षक भिंतीलगत असलेला पदपथ खचल्यामुळे जमीला अनिस खान (३५) ही महिला खड्डय़ात पडली आणि त्यातील चिखलात रुतून जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी ठाणे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवकांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातून संताप व्यक्त होऊ लागला असतानाच सोमवारी जमीलाच्या नातेवाईकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. या मोच्र्याची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी धाव घेऊन मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. त्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले होते. अखेर विरोधी पक्षनेते संजय भोईर आणि नगरसेवक सुहास देसाई यांनी प्रवेशद्वारावर जाऊन मोर्चेकरांची भेट घेतली आणि त्यांची आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी भेट घडवून दिली. या भेटीदरम्यान, महिलेच्या मृत्युप्रकरणी आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एकास नोकरीत सामावून घेण्याची मागणी मोर्चेकरांकडून करण्यात आली. तसेच याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सविस्तर चौकशी लावण्यात आल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी या वेळी स्पष्ट केले.