मासुंदा तलावातील कार्यक्रमांच्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह; नाटय़ परिषदेकडून मनधरणी सुरू
काहीतरी नवीन करून संमेलनांचा ‘इव्हेंट’ करण्याची प्रथाच अलीकडे रूढ होऊ लागली आहे. ९६व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनातील काही कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलावात उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या रंगमंचावर भरवण्याची घोषणा आयोजकांनी केली. मात्र, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या नाटय़ संमेलनाच्या तरंगत्या रंगमंचाची तयारी तर दूरच; आयोजकांनी त्यासाठी पुरेशी परवानगीही घेतली नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नाटय़ संमेलनाचा तरंगता रंगमंच अंधांतरीच राहण्याची शक्यता आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी नाटय़ संमेलनाचे ठिकाण ठरल्याने आयोजकांची ठाण्यात होणाऱ्या नाटय़संमेलनाचे नियोजन करताना दमछाक होत आहे. संमेलन ठाणेकर यशस्वी करतील असा विश्वास संयोजकांकडून व्यक्त केला जात असला तरी या नियोजनातील अडचणींचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. नाटय़ संमेलनाच्या स्वागत समितीने जानेवारी महिन्यामध्ये नियोजनांच्या बैठकीत पहिल्यांदा मासुंदातील तरंगत्या रंगमंचाची घोषणा केली होती. नाटय़ संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान पहाटेच्या वेळी मासुंदाच्या तलावातील तरंगत्या व्यासपीठावर गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये या मैफिलींमध्ये अनेक दिग्गज गायक, अभिनेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सकाळच्या या कार्यक्रमात मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. शिवाय सायंकाळी विविधरंगी कार्यक्रम या तरंगत्या रंगमंचावर होणार आहेत. सगळे नियोजन पूर्ण होत आले असले तरी त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मात्र शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेल्या नाहीत. ठाणे महापालिका नाटय़ संमेलनातील मुख्य आयोजक असल्याने त्यांच्याकडून तात्काळ परवानगी मिळेल हे आयोजकांनी गृहीत धरले आहे. अग्निशमन विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे हा अर्ज गेला आहे. प्रशासनाने यासाठी सुरक्षेच्या गोष्टींची काय तरतूद आहे याची विचारणा सुरू केली आहे. ही परवानगी तात्काळ मिळावी यासाठी संयोजकांनी आग्रह धरला आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीस परवानगी देण्यात येणार नसल्याने संयोजन समितीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सुरक्षिततेचा आढावा घेऊनच तरंगत्या रंगमंचाला परवानगी देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरंगता रंगमंच उभारल्यानंतर रसिक कुठे जमणार, हा रंगमंच मजबूत असेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

तरंगत्या व्यासपीठावर..
* १९ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता राहुल देशपांडे, आनंद भाटे यांचे नाटय़संगीत
* २० फेब्रुवारी सकाळी ६ वाजता महेश काळे, सुबोध भावे यांचा ‘सूर निरागस हो’
* २१ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता शौनक अभिषेकी, मंजुषा पाटील यांचा ‘तीर्थ विठ्ठल’
* या तिन्ही दिवशी सायंकाळी ४ वाजता विविध कलाविष्कार

अद्याप अर्जच नाही
यासंदर्भात आमच्या विभागाकडे अद्याप आयोजकांकडून परवानगीचा अर्जच आलेला नाही. अर्ज आल्यानंतर नियम पडताळून जर योग्य असेल तरच तलावातील तरंगत्या रंगमंचावरील कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल.
– अरविंद मांडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महापालिका