घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणारा माणूस ही मुंबई-ठाणेकराची ठळक ओळख. घाई हा त्याचा स्थायीभाव. घरातून कामासाठी बाहेर पडताच जिथे मिळेल तिथे शॉर्टकटशोधून कार्यालयात वेळेवर पोहोचण्याची त्याची घाईगडबडही नित्याचीच. त्यामुळेच हाकेच्या अंतरावर असलेला सुरक्षित रस्ता सोडून काही मिनिटे वाचवण्यासाठी प्रवासी थेट रूळांवर धाव घेतात. पण हा शॉर्टकटप्रसंगी जिवावरही बेतू शकतो. ठाण्यापल्याडच्या रेल्वेस्थानकांतील अशाच चोरवाटांचा हा आढावा.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या एकूण अपघाती मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक अपघात रेल्वे रूळ ओलांडताना होतात. वर्षभरापूर्वी संसदीय समितीच्या पाहणीदरम्यान हे समोर आले होते. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने एक अहवाल तयार केला होता. या अहवालात मध्ये रेल्वेवरील २९ ठिकाणे जीवघेणी ठरत असल्याचे नमूद केले होते. या अहवालात ठाणे-कळवा या दरम्यानच्या ठिकाणांचा समावेश होता. ठाणे स्थानकाहून विटावा गाठण्यासाठी शेकडोजण थेट रेल्वे रुळांवरून चालताना आढळून आले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणार असल्याचे सांगितले होते. मात्र ती घोषणा कागदावरच आहे.

ठाणे स्थानकावरून शेकडो प्रवासी विटावा भागातून प्रवास करतात. ठाणे रेल्वे स्थानकाहून ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील रुळांवरून चालत गेल्यास अवघ्या १० मिनिटांत विटावा भागात पोहोचता येत असल्याने अनेकजण हा धोक्याचा मार्ग पत्करीत आहेत. रेल्वे स्थानकाला लागून चालण्यासाठी समांतर मार्ग नसल्याने प्रवासी थेट रेल्वे मार्गातून चालण्याचा धोका पत्करतात.  वर्षभरापूर्वी संसदीय समितीने मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रत्यक्ष फिरून पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे आढळले होते.

ठाणे आणि कळवादरम्यान, एकाच वेळी शेकडो प्रवासी रुळांवरून, रुळांच्या बाजूच्या अरुंद जागेतून चालत असल्याचे समितीला आढळून आले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने सीएसएमटी ते विठ्ठलवाडी आणि सीएसएमटी ते वाशी या दरम्यान २९ धोकादायक ठिकाणे निवडली होती. यात या ठिकाणाचाही सामावेश होता. या धोकादायक ठिकाणी सुरक्षा दलाने सुरक्षा रक्षक तैनात करणे अपेक्षित होते. पण सुरक्षा रक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे ते अद्यापही शक्य झालेले नाही.

ठाणे स्थानकाहून विटावा किंवा दिघा भागात पोहोचण्यासाठी सध्या अर्धा तास लागतो. तसेच त्यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. त्यामुळे आम्ही या मार्गावरून चालत असल्याचे सुमेध जाधव या तरुणाने सांगितले. या रुळांवरून फक्त विटावा दिघा भागातीलच नव्हे तर कळव्याच्या दिशेने राहणारे प्रवासीही याच मार्गाचा अवलंब करत असल्याचे शैलेश विश्वकर्मा यांनी सांगितले.

चाळीतून थेट रुळांवर

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रुळाला लागूनच दाटीवाटीने असलेल्या चाळीतून थेट रेल्वे रुळावर आणून सोडणारी एक वाट आहे. शेकडो ठाणेकर या वाटेचा उपयोग करतात.  या चाळीपासून जवळच असलेल्या रस्त्यावरूनही थेट स्थानकात पोहोचता येते. परंतु, अनेकजण हा सुरक्षित प्रवास टाळून चाळीतील गल्लीबोळातील वाट धरून रेल्वे  रुळांपर्यंत जातात व रुळांवरून चालत स्थानक गाठतात. स्थानकाजवळून सिडको परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधण्याचा निर्णय झाला असला तरी, प्रत्यक्षात भिंत अस्तित्वात नाही. अनेकदा सिग्नलमुळे रेल्वेगाडी थांबली असता प्रवासी रुळांवर उडय़ा मारून पुढे मार्गस्थ होतात. मात्र, यामध्ये असलेल्या धोक्याची त्यांना अजिबात फिकीर नसते.