मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना नाहक त्रास; फलाट आणि लोकलमधील अंतर अजूनही जास्त

फलाट आणि लोकल यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी भाईंदर रेल्वे फलाटांची उंची वाढविण्याचे काम गेले अनेक दिवस सुरू आहे. काही फलाटांचे काम रेल्वे प्रशासनाकडून अर्धवट स्थितीत सोडण्यात आले असल्याने प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

फलाट आणि लोकल यांच्यात अंतर मोठे असल्याने त्यामध्ये अडकून अनेक अपघात घडले आहेत. फलाटांची उंची वाढविण्याची गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने फलाटांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. भाईंदर स्थानकातील फलाट क्रमांक चारची उंची वाढविण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे, परंतु फलाटाच्या केवळ किनाऱ्याची बाजू उंच केल्यानंतर हे काम रेंगाळले आहे. किनाऱ्याचा भाग उंच व उर्वरित फलाट खाली अशा विचित्र परिस्थितीत प्रवाशांना लोकल पकडण्याची कसरत करावी लागते.

जोराचा पाऊस आला की फलाटावर पाणी साचून राहात असल्याने प्रवाशांना पाण्यातच उभे राहण्यावाचून अन्य पर्याय शिल्लक राहात नाही. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी एक प्रवासी महिला फलाटावर पडता पडता वाचली. प्रशासनाकडून होणाऱ्या कामातील दिरंगाईमुळे  जागरूक प्रवासी कृष्णा गुप्ता यांनी अखेर रेल्वे प्रशासनाच्या तक्रार नोंदवहीत अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे.

उंची वाढविण्याच्या अर्धवट कामामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे उंची वाढविण्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.