मृत तरुणाच्या खिशात सापडलेल्या रेल्वे तिकिटाचा माग काढत रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वालिव पोलिसांनी त्या तरुणाच्या हत्येची उकल केली आहे. या प्रकरणी मृत तरु णाच्या मित्रास पोलिसांनी अटक केली.
वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातिवली येथे काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. तीक्ष्ण हत्याराने त्याची हत्या करण्यात आली होती; परंतु त्याची ओळख पटेल असे काही आढळून आले नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे विविध ठिकाणी लावून त्याची माहिती देण्याचे आवाहन केले होते. दरम्यान पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात एक रेल्वे तिकीट आढळले होते. मुंबई सेंट्रल ते नालासोपारा असे ते तिकीट होते. त्यामुळे पोलिसांनी मुंबई सेंट्रल स्थानकात शोध सुरू केला.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये मृत तरुण आणि त्याच्यासोबत आणखी एक तरुण दिसला. पोलिसांनी त्याच्या या मित्राचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा तो बेपत्ता असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या आरोपी तरुणाने हत्येची कबुली दिली. मृत तरुण आणि आरोपी यांच्यात समलैंगिक संबंध होते; परंतु आरोपीने ते संबंध तोडल्याने मृत तरुणाने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त होऊन हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी आरोपी तरुणाने त्याची हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अद्याप त्याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मृत तरुण हा दादर येथे राहणारा होता. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला आहे. खिशात सापडलेल्या रेल्वे तिकिटाच्या जोरावर हत्येची उकल केल्याने वालिव पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.