भारतीय रेल्वेतून आरक्षित प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना शयनकक्षात खालचे आसन देण्याऐवजी सर्वात वरचे आसन (अप्पर बर्थ) दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान आसन गाठणे काहीवेळेला अशक्य होऊन बसल्याने निद्रानाश ओढवून घ्यायची वेळ वयोवृद्धांवर आली आहे.
आरक्षण करताना ज्येष्ठ नागरिकांच्या वयानुसार त्यांना खालचे आसन उपलब्ध करून देण्याची सुनियोजित यंत्रणा रेल्वे आरक्षण प्रणालीत करण्यात आली आहे, असा दावा रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  
लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास रेल्वेच्या कारभारामुळे सध्या अवघड झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना खालील आसने राखीव ठेवण्यात यावीत, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी महाव्यवस्थापकां सोबतच्या बैठकीत याविषयी राखीव आसनांची मागणी     केल्याची माहिती संघटनेचे मधू कोटीयन यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकल गाडय़ांमध्ये वेगळ्या डब्यांची व्यवस्था करण्यासंदर्भात प्रवाशांची रेल्वे विरोधातील न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याच वेळी लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वेगळा अनुभव येत आहे. या गाडय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी राखीव आसने नसल्याने त्यांच्यासाठी लांबपल्ल्याचा प्रवास अवघड ठरू लागला आहे. मुंबईतून भारताच्या विविध प्रांतांमध्ये जाणाऱ्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांसाठी रेल्वेच्या वतीने तिकिटात सूट देण्यात आली असली तरी त्यांना आसनाच्या स्थितीत मात्र कोणत्याही प्रकारची राखीव व्यवस्था नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही आसनावरून प्रवास करावा लागतो. शयनकक्षात तीनस्तरीय आसनव्यवस्थेतील सर्वात वरच्या जागी जाण्यासाठी पाच ते सहा फुटांच्या उंचीच्या अंतरावर चढावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते शारीरिकदृष्टय़ा शक्य होत नाही. यंदाच्या रेल्वे अर्थ संकल्पामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी त्याकडे लक्ष वेधून तशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले असले तरी ज्येष्ठ नागरिकांच्या परिस्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही.        
ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आसनांची व्यवस्था
ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या वतीने विविध सुविधा देण्यात येत असून आरक्षणाच्या प्रसंगी जेष्ठ नागरिकांचे वय टाकल्यानंतर त्यांना प्राधान्याने खालच्या आसनांची व्यवस्था करून देण्याची व्यवस्था रेल्वेच्या व्यवस्थेमध्ये आहे. मात्र जागा भरलेल्या असतील तर अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वरचे आसन दिले जाते. मात्र गाडय़ांमध्ये तिकीट तपासणीसाच्या मदतीने त्यांची आदलाबदल करता येऊ शकते, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.   

९० वर्षांच्या आजींना वरचे आसन
२५ एप्रिल रोजी स्वराज्य एक्स्प्रेसमधून जम्मू तावी ते बांद्रा टर्मिनस असा सुमारे ३८ ते ४० तासांचा प्रवास करणाऱ्या एका ९० वर्षांच्या ज्येष्ठ आजींना वरचे आसन देण्यात आल्याने या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारच्या अनेक घटनांच्या तक्रारी रेल्वे प्रवासी संघटनांकडे येत आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून सुमारे २ ते ३ दिवसांचा सलग प्रवास करावा लागत असल्याने अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना वरच्या आसनांवरून (अप्पर बर्थ)  प्रवास करणे शक्य होत नाही.