राज ठाकरे यांचा सवाल; दहीहंडीपाठोपाठ गणेश मंडळांचीही पाठराखण

सण-उत्सवांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करून उत्सव बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक सण-उत्सव त्याच उत्साहात साजरा केला गेला पाहिजे. रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करू दिला जात नसेल तर गणपती न्यायालयात बसवायचे का, असा सवाल करीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दहीहंडी मंडळांपाठोपाठ गणेश मंडळांची पाठराखण केली. दहीहंडी मंडळांवर कारवाई केल्यास परिणामांना तयार राहा, असे आव्हान राज यांनी राज्य सरकारला दिले. नियमभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा पथकांना भेटल्यानंतर ठाण्यातील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

न्यायालयाने सण-उत्सवांबाबत मांडलेल्या भूमिकेला विरोध असल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला. दहीहंडीतून ऑलिम्पिक पदक मिळत नाही, अशी खोचक मते न्यायालयाने मांडण्याची गरज नाही. कोणत्याच लेखी निर्णयाच्या प्रतीमध्ये अशा प्रतिक्रियांचा समावेश नसताना अशा प्रतिक्रिया द्यायच्याच कशाला, असा सवाल राज यांनी केला. दहीहंडीचे थर कितीही असले तरी दहीहंडी २० फुटांवरच बांधण्यात आली होती. त्यामुळे कायदा मोडण्याचा प्रश्नच नाही. तरीही दहीहंडी पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई केल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी. हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

सदोष मनुष्यवधासारख्या गुन्ह्य़ांसारखे गुन्हे दहीहंडीच्या उत्सवातील मंडळांवर लावणे चुकीचे आहे. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मंडळांशी सरकारने संवाद साधून या संदर्भातील आचारसंहिता तयार करावी. उत्सवातील बाजारूपणाला विरोध असल्याचे सांगत उत्सवांमध्ये आलेल्या पैशाची सूज कमी करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. दहीहंडीला व्यासपीठ, डीजे, पैशांची बक्षिसे लावू नयेत. ठाण्यातील मनसे पदाधिकारी अविनाश जाधव यालाही पैशांचे बक्षीस लावू नये, असे सांगितले असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

जीएसटी वसुली पालिकांकडून हवी

जीएसटी करप्रणाली योग्य असली तरी त्याची वसुली महापालिकांमार्फत व्हावी, अशी भूमिका राज यांनी मांडली. जीएसटी वसुली महापालिकांकडून केल्यास शहरांच्या विकासाला त्याचा फायदा होईल. अन्यथा प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे हात पसरण्याची वेळ येईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गुजराती मते मिळवण्यासाठी भाजपची रणनीती

मुख्यमंत्र्यांकडून गुजराती ट्वीट केली जातात. त्यातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पर्युषण पर्वातील मांसविक्रीला बंदी घालून मनसे आणि शिवसेनेने या विषयावर प्रतिक्रिया दिल्यानंतर वाद तयार करण्याचा प्रयत्न भाजप करतो. जैन आणि गुजराती मते मिळवण्यासाठीची ही रणनीती आहे. अनेक ठिकाणी शाकाहारी वस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघ तयार केले जात आहेत. श्रावणात मांसविक्रीस बंदी नसते तर पर्युषण काळात बंदी करण्याची गरज नाही, असे राज म्हणाले.