आसनगाव आणि तानशेत रेल्वेस्थानकादरम्यान ‘राज्य राणी एक्स्प्रेस’खाली म्हैस चिरडल्याने या गाडीची वाहतूक सुमारे एक तास रखडली. मध्य रेल्वेवरील इतर गाडय़ांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. या अपघातानंतर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला. ही गाडी सुमारे एक तास आसनगाव आणि तानशेत स्थानकादरम्यान खोळंबून पडली. यावेळी कसारावरून येणाऱ्या लोकल गाडय़ा, पंचवटी आणि मंगला एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. ८.१५ पासून सुमारे ९.५५ पर्यंत हा मार्ग बंद होता. या अपघातामुळे कोणतीही लोकल फेरी रद्द केली नसली तरी एक तासाच्या खोळंब्यामुळे मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर आसनगावच्या पुढे मात्र वाहतुक सुरळीत सुरू होती.
नाशिक-पुणे राज्यराणी एक्स्प्रेस ही गाडी सकाळी मुंबईकडे येत असताना सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास आसनगाव तानशेत स्थानकादरम्यान तीची धडक भटक्या म्हशीला बसली. या अपघातामध्ये म्हशीचा मृत्यू झाला असला तरी इंजिनलामध्येही बिघाड उत्पन्न झाला होता. मध्य रेल्वेकडून दुरूस्तीसाठी कल्याण कारशेडकडून तांत्रिक मदत पोहवण्यात आली असली तरी दुरूस्ती होण्यासाठी ४५ मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे कसाराकडून मुंबईच्या दिशेने येणारी संपुर्ण वाहतुक यामुळे ठप्प झाली होती. राज्य राणी एक्स्प्रेसच्या पाठोपाठ कसारा लोकल, पंचवटी आणि मंगला एक्स्प्रेसचाही खोळंबा निर्माण झाला होता. या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. तर सोमवारी मुंबईच्या दिशेने कार्यालयात निघालेल्या प्रवाशांनाही विलंबाचा सामाना करावा लागला. आसनगाव पुढील वाहतुक मात्र सुरळीत सुरू होती.

संरक्षक भिंतीची गरज..
कल्याणपलिकडील रेल्वे रूळांच्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा कुंपण नसल्याने या भागातील रेल्वे रूळांवर येणाऱ्या पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या भटक्या म्हैशी रेल्वे रूळांवरच भटकत असतात. अंधुक प्रकाशामुळे या म्हशी रेल्वे रूळांवर दिसत नाहीत तर कधीकधी अचानकपणे या रेल्वे रूळांवर येते असतात. अशाप्रकारचे अपघात या भागामद्ये गेली अनेक वर्षांपासून वारंवार घडत आहेत. त्यामुळे या रेल्वे रूळांच्या बाजुला संरक्षक भिंत अथवा कुंपण घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.