कॉर्नर म्हटले की तिथे सर्वसाधारणपणे सॅण्डविच, पावभाजी, फ्रँकी असे फास्टफूडमध्ये गणना होणारे पदार्थ मिळतात. त्यापलीकडे मटार पनीर, आमटी भात, झुणकाभाकर असे घरगुती पदार्थ खायचे असतील तर मात्र हॉटेल किंवा खानावळीत जावे लागते.

ठाण्यातील ‘सखीज् किचन’मध्ये मात्र फास्टफूड आणि घरगुती पद्धतीचे पारंपरिक पदार्थ असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. अश्विनी हडके यांनी हे कॉर्नर सुरू केले. ‘सखीज् किचन’मध्ये आपल्याला कांदेपोहे, उपमा, पराठा, सॅण्डविच अशा नाश्त्याच्या प्रकाराबरोबरच पनीर बटर मसाला, दालमखनी, छोले पालक, चिकन टिक्का, चिकन कबाब, झुणका भाकरी, बिर्याणी असे तब्बल ११२ प्रकारचे घरगुती आणि हॉटेलमधील पदार्थ मिळतात.

‘सखीज् किचन’मध्ये नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे पदार्थ उपलब्ध असल्याने दररोज जरी आपण येथे गेलो तरी दरदिवशी येथे आपल्याला विविध पदार्थाची चव चाखायला मिळू शकते. सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली किंवा उत्तपा सांबर, घरगुती पद्धतीने बनवलेले उपमा किंवा कांदेपोहे, आलूमेथी- पनीर पराठा, उपवासाची साबुदाणा खिचडी, विविध डाळीचं मिश्रण करून केलेला वैशिष्टय़पूर्ण असा डाळ पकोडा, हराभरा कबाब, चीज, क्लब सॅण्डविच, पावभाजी, नॉनव्हेज फ्रँकी, आपल्या सर्वाच्या आवडतीची कांदा किंवा मिरची भजी तसेच वडापावही येथे मिळतो. नाश्त्याप्रमाणेच इथे आपल्याला भरपेट जेवणासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पनीर बटर मसाला, पालक पनीर, दमआलू, मसूर डाळ, मिक्स डाळ तडका, राजमा, वैशिष्टय़पूर्ण असे पालक छोले, वांगे मसाला आणि मेथी लसुणी म्हणजे खवय्यांसाठी घरगुती चवीच्या पदार्थाची एक प्रकारची मेजवानीच.

चिकन, मटण किंवा मासे म्हटले की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातच जर चिकन करी, फिश फ्राय किंवा बिर्याणी असेल तर मांसाहारी खवय्यांची ब्रह्मानंदी टाळीच लागते. येथे आपल्याला चिकन आणि मटण करी, चिकन- मटण आणि अंडे बिर्याणी, पालक चिकन आणि ‘सखीज्’ मसाला टाकून तयार केलेले आगळेवेगळे असे पालक चिकन, गावठी कोंबडीपासून तयार केलेले गावरान चिकन, मेथीच्या भाजीत मटण टाकून तयार केलेले ड्राय मेथी मटण. कांदा, टोमॅटो, बडीशेप पावडर आणि गरम मसाला टाकून केलेले वैशिष्टय़पूर्ण असे काश्मिरी मटण, फिश करी आणि फिश फ्राय असे अनेक लज्जतदार पदार्थ येथे उपलब्ध आहेत. ‘सखीज् किचन’चे वेगळेपण म्हणजे येथे मिळणारे नानाविध प्रकारचे तंदूर पदार्थ. हराभरा कबाब, चीज कबाब, वैशिष्टय़पूर्ण असा मिक्स व्हेज टिक्का, तंदुरी आलू, मुलतानी मशरूम, पनीर कोळीवाडा, पनीर अंगारा, शिख कबाब, व्हेज प्लेटेड असे व्हेज स्टार्टर्स आणि त्याचबरोबर चिकन तंदुरी, चिकन मेरिनेट करताना जास्त प्रमाणात लिंबाचा वापर करून तयार केलेली नावीन्यपूर्ण लेमन तंदुरी, विविध प्रकारचे टिक्का, कबाब आणि तंदूरचे मिश्रण असलेले चिकन प्लॅटर, चिकन लसूण किंवा हरियाली, चिकन रेशमी टिक्का, चिकन लॉलिपॉप, चिकन राजाली कबाब, चिकन मलेशियन कबाब, चिकन कॉम्बो कबाब, चिकन झफरानी कबाब असे अनेकविध प्रकारचे स्टार्टर्स खाऊनच पोट भरून जाते.

याशिवाय झणझणीत पिठलं भाकरी, आमटी भात आणि त्याचबरोबर मस्त साजूक तूप टाकून केलेली पूर्ण पोळी असे आपले गावरान किंवा पारंपरिक पदार्थही येथे मिळतात. येथे आपल्याला घरगुती आमटी भात, पुरणपोळी, डाळबाटी त्याचबरोबर वरण आणि गट्टय़ाची भाजी, सर्वाची आवडती झणझणीत झुणका-भाकर, लसूण चटणी, बिहार स्पेशल सत्तू पराठा आणि चण्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत अशा अस्सल पारंपरिक पदार्थाची चव येथे आपल्याला चाखायला मिळते. येथे हक्का नूडल्स, फ्राईड राईस, चिली पनीर ग्रेव्ही, व्हेज मन्चुरिअन, चिली चिकन असे तरुणांना आवडणारे पदार्थही उपलब्ध आहेत. प्लेन पिझ्झा, चिकन पिझ्झा आणि पनीर पिझ्झा असे काही पिझ्झा आणि व्हेज सलाड आणि मिक्स सलाड विथ कर्ड अशा काही इंडो वेस्टर्न पदार्थाची चवही येथे चाखायला मिळते.

नाश्ता किंवा जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायला आपल्या सर्वानाच आवडते. इथे खीर, गुलाबजाम, शाही तुकडा आणि कप केक असे काही गोड पदार्थ येथे स्वीटडिश म्हणून मिळतात. सध्या आपण सर्व खूप फिटनेसप्रेमी झालो आहोत. त्यामुळे डाएट करणे, सकाळी जॉगिंग असे अनेक उपाय करतो. फिटनेससाठी आहारात ज्यूस घेणे लाभदायक ठरते. ज्यूस आपण कधीही घेऊ शकतो.  येथे आपल्याला मिक्स व्हेज ज्यूस, दुधीचा ज्यूस, गाजर, बीट आणि टॉमेटोचे ज्यूस आणि केळे, चिकू आणि सफरचंदाचा मिल्कशेक असे पौष्टिक ज्यूसचे प्रकार येथे मिळतात.

‘सखीज् किचन’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारी गावरान झणझणीत झुणका-भाकर. खुसखुशीत पुरणपोळी आणि बारीक चिरलेली कच्ची मेथीची भाजी, कांदा, शेंगदाण्याचे कूट, साखर, लिंबू आणि मीठ यांचं मिश्रण करून बनविलेली नावीन्यपूर्ण आणि हेल्दी मेथी सलाड. त्यामुळे काही वेगळे खायची इच्छा असेल तर ‘सखीज् किचन’ला आवश्य भेट द्यायला हवी.

सखीज् किचन

  • फ्लोरा शॉपिंग कॉम्प्लेक्स, ए विंग, शॉप नंबर २०, हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे (प).