रामदास आठवले यांचा भाजपला सल्ला

कलंकित नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी भाजपला दिला. महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांप्रमाणे उल्हासनगरमध्येही पक्षाचे वजन वाढविण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करीत असून, त्यासाठी पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांचे नाव न घेता कलंकित नेत्यांना प्रवेश देणे भाजपने टाळावे, असे मत आठवलेंनी रिपाइं कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

महापौरपदावर दावा

मुंबई महापालिकेतील उपमहापौरपदावर दावा केल्यानंतर रामदास आठवले यांनी उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर दावा केला आहे. रिपाइंची उल्हासनगरमधील ताकद अधिक असून जवळपास ४० प्रभागांत रिपाइंचा प्रभाव आहे. त्यामुळे १५ पेक्षा अधिक जागा रिपाइंला हव्या आहेत. तसेच भाजपची शिवसेनेसोबत युती न झाल्यास अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. गोवा विधानसभेत भाजपला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

सेना-भाजप वादामुळे नियुक्त्या रखडल्या राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेना आणि भाजपमधील वादांमुळे महामंडळांचे अध्यक्षपदांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. दोन्ही पक्षांनी वाद मिटवावेत, असे आवाहन आठवले यांनी या वेळी केले.