रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशनिंग व्यवस्थेतील कारभार अधिक पारदर्शक होणार आहे, असा दावा केला जात आहे. कल्याण शिधावाटप कार्यालयातर्फे आतापर्यंत या प्रक्रियेतील ४३ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती साहाय्यक शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली.
रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे ही व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण शहरातील सर्वच शिधावाटप दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने शिधा वाटपधारकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित अर्ज उपलब्ध करण्यात आले असून सर्व रेशनकार्ड धारकांनी हे अर्ज भरून जमा करावेत, असे आवाहनही शिधावाटप अधिकाऱ्यांकडून आले आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, आपली जुनी शिधा वाटप पत्रिका, बँकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्ज भरून द्यावयाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व वर्गवारीच्या शिधा वाटप पत्रिकांच्या नोंदणीसाठी हे पुरावे आवश्यक ठरणार आहेत.