केबल व्यावसायिकाची हत्या केल्याची पत्रकारांकडे कबुली? ल्लरवी पुजारी टोळीतून बाहेर पडलेल्या सुरेश पुजारीची शक्कल
आजकाल विविध कंपनी, उद्योगांपासून राजकारण्यांपर्यंत साऱ्यांसाठी आवश्यक ठरत असलेले प्रसिद्धीतंत्र आता माफिया टोळ्यांनाही गरजेचे वाटू लागले आहे. कुख्यात गुंड रवी पुजारी याच्यापासून फारकत घेतलेल्या सुरेश पुजारीने हेच तंत्र अवलंबले असून उल्हासनगरमधील एका केबल व्यावसायिकाची आपण हत्या केल्याचे त्यानेच काही स्थानिक पत्रकारांना दूरध्वनीवरून कळवल्याचे समजते. गुन्हेगारी विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून दहशत वाढवण्याच्या हेतूने काही टोळ्यांतील गुंड केलेल्या गुन्ह्याची माहिती पत्रकारांकडे पोहोचवत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर येथील गोल मैदान भागातील केबल व्यावसायिक सच्चू आत्माराम कारिया (५०) यांची शुक्रवारी दुपारी दोन मारेकऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात तर्कवितर्काना उधाण आले असतानाच घटनेच्या काही वेळातच सुरेश पुजारी याने स्थानिक पत्रकारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण ही हत्या घडवल्याचे सांगितले. या हत्येमागे रवी पुजारी टोळीचा संबंध नाही, असेही सुरेशने पत्रकारांना सांगितल्याचे समजते.
सच्चू कारिया यांच्या हत्येनंतर स्थानिक पत्रकारांना दूरध्वनी करण्यामागे सुरेशचा नेमका काय हेतू असावा, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र आपण रवी पुजारी टोळीतून बाहेर पडून स्वत:ची टोळी सुरू केल्याचे दाखवून देण्यासाठी त्याने हे प्रसिद्धीतंत्र राबवले असावे, असा अंदाज आहे. सच्चू कारिया यांची हत्या खंडणीसाठी झाल्याचेही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. सच्चू यांना खंडणीसाठी सुरेश हा दूरध्वनीद्वारे धमकावीत होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मात्र सुरेश सध्या परदेशात वास्तव्यास असल्याचे समजते.