अंबरनाथच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ
अरविंद बुधकर, अंबरनाथ
मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस वाढती महागाई आणि जागेचा तुटवडा पाहता कल्याणपलीकडील शहरांमध्ये स्थलांतर करण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. त्यातूनच अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन शहरे आता वाढू लागली आहेत. फार मोठय़ा प्रमाणात मध्यमवर्ग येथे स्थिरावू लागला आहे. कर्जाचे ओझे घेऊन सुखी जीवनाची स्वप्ने बघत सकाळ/संध्याकाळ धक्के देत / खात गाडीच्या गर्दीत लोंबकाळू लागला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारी अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, कच्चे बांधकाम आदी समस्या आसपास दिसूनही त्या सहन करीत आपले रहाटगाडगे हाकत आहे. याचाच गैरफायदा घेऊन गल्लीतले पुढारी, नगरपालिकेतील अधिकारी सरकारचा पैसा आपलाच समजून साऱ्या पैशाचे कोटकल्याण करू लागले. वास्तविक पाहता हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो. पर्यायाने अंबरनाथ शहर बकाल झाले आहे. शहर ज्या प्रमाणात वाढतेय, त्या तुलनेत विकासकामे होत नाहीत. विकासकामांची कासवगती ही या शहराची डोकेदुखी आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानक ते आनंदनगर एम.आय.डी.सी.पर्यंत असणाऱ्या रस्त्यावरचे चित्र अतिशय भयावह असे आहे. आनंदनगर एम.आय.डी.सी. येथे अनेक कारखाने आहेत, परंतु नागरी सोयीसुविधांच्या नावाने मात्र येथे शंखच पाहायला मिळतो. परिसरातील रस्ते खराब असल्यामुळे कामगारांच्या बसेस वेळेवर पोहोचत नाहीत. स्टेशनजवळ गाडी उभी करण्यास मोकळी जागाही नाही. रेल्वे पूल ते रस्ता हा संपूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला दिसतो. रेल्वे पुलाला छत नसल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होताना दिसते. उन्हाळ्यात उन्हाचा तर पावसाळ्यात पावसाचा सामना प्रवाशांना या ठिकाणी करावा लागतो. एकंदरीतच काय पुलाला छत नसल्याने प्रवाशांची या ठिकाणी तारांबळ उडताना दिसते. रेल्वे पूल बांधतेवेळी पुलाला छत असावे, असे रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही सुचले नाही. त्यामुळे खरोखरच त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. काही ठिकाणी पावसाच्या आधी दोन-तीन महिने सुरू झालेले सीमेंट काँक्रीटचे काम अजून पूर्ण झालेले नाही. बाकी शहरातील बहुतांशी परिसरांत रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे. परंतु शहरातील लोकप्रतिनिधींना या सर्व प्रकाराचे सोयरेसुतक नाही.
कल्याण-मलंगगड रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
सुयश पेठे, कल्याण
कल्याणातील पत्री पूल ओलांडला की, नेतिवलीकडे जाताना मलंगगड रस्त्यावर दोन किलोमीटरच्या रस्त्यावर इतके खड्डे आणि घाणीचे साम्राज्य आहे की, विचारण्याची सोयच नाही. नागरिकांच्या आरोग्याला अतिशय धोकादायक असे वातावरण परिसरात पाहायला मिळते. परिसरात काही ठिकाणी सांडपाणीही तुंबल्याचे पाहायला मिळते. फळवाले, भाजीवाले आपापल्या गाडय़ा उभ्या करून या परिसरात व्यवसाय करीत आहेत. याच रस्त्यावरून तळोजा एम.आय.डी.सी.मध्ये कंपन्यांच्या बसेस जात असतात. संबंधित रस्ता अरुंद असून परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी दरुगधी पसरली आहे. हा रस्ता खराब झाल्याने जड वाहने, चारचाकी वाहने काटई नाक्यावरील बदलापूर पाइपलाइन रस्त्याने जाणे पसंत करतात. त्यामुळे वाहतूकीसाठी जास्त वेळ खर्च होतो आणि मानपाडा शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या रस्त्यावर खाचखळगे जास्त असल्याने प्रवाशांना आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागते. गेल्या दीड वर्षांपासून संबंधित रस्त्याची अवस्था अशीच आहे. परंतु प्रशासन या प्रश्नाविषयी उदासीन असल्याचे ठळकपणे पाहायला मिळते. स्थानिक लोकप्रतिनिधी परिसरात नवीन बांधकाम करण्यात मग्न असल्यामुळे त्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मोदींचे स्वच्छता अभियान प्रशासनाने किती गांभीर्याने घेतले आहे, याची प्रचीती यावरून आपल्याला येईल. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणारे स्मार्ट प्रशासन संबंधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना चांगला रस्ता आणि आरोग्यदायक परिसर लवकरात लवकर उपलब्ध करून देईल काय?