रवी पटवर्धन,अभिनेते

वाचन माणसाला सर्वार्थाने परिपक्व करत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आपण लहानपणापासून वाचलेल्या पुस्तकांना आणि त्या पुस्तकांमधून आपणास ज्ञात झालेल्या विविध गोष्टींना एक विशिष्ट स्थान असते. माझ्या बाबतीत तरी वाचन हा माझा एक खास नाटय़मित्र आहे. बालपणी इतरांप्रमाणेच इसापनीती, पंचतंत्र,

अलिबाबा आणि चाळिशीतले चोर, गोटय़ा अशा गूढ आणि साहसी कथांपासून माझ्या वाचनाची सुरुवात झाली. मी काही फार मोठा वाचक नसलो तरी बालपणी जेव्हा ‘वीरवचन’ या नाटकातून नाटय़क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा नाटकाचा अभ्यास म्हणजेच एका साहित्याचा अभ्यास असतो हे मला समजले आणि यामुळेच एक छंद किंवा विरंगुळा यापेक्षाही माझ्यासाठी वाचन म्हणजे एक प्रकारचा नाटय़ अभ्यासच झाला.

बालपणी ‘बेबंदशाही’ या संभाजी महाराजांवरील नाटकात काम करत असताना सेतू माधव पगडी यांचे बखर हे पुस्तक वाचनात आले. तेव्हापासून मला ऐतिहासिक साहित्य किंवा कथा वाचण्याची गोडी लागली. प्रामुख्याने मला केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, मंगेश पाडगावकर अशा विविध कवींच्या रचना खूप आवडतात. या काव्य पुस्तकांच्या सोबतच नाटय़शास्त्र, संगीतशास्त्र संमोहनशास्त्र, मानसशास्त्र यांवरची विविध अभ्यासविषयक पुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. माझ्या संग्रहातील पुस्तकांसाठी घरात खास असा बुकशेल्फ नसून माझी पुस्तके पूर्ण घरभर असतात. जे पुस्तक हवे आहे ते घरात शोधायचे आणि शांतपणे बसून वाचायचे हीच काय ती माझी वाचनाची पद्धत आहे. महाविद्यालयीन वयात वि. स. खांडेकर यांची दौलत, उष:काल ही माणसाच्या मनात आशावाद निर्माण करणारी पुस्तके मी वाचली आहेत. एकच प्याला, भाऊबंदकी, पुण्यप्रवाह अशा नाटकात काम करताना माझे हे वाचन उपयोगी पडले. अभिनय कारकिर्दीसाठी काही महत्त्वपूर्ण साहित्याचे वाचन माझ्याकडून झाले. साहित्यिक आणि काव्य वाचनाबरोबरच कोणत्याही कलाकाराला आपला अभिनय सादर करताना सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भाषण, संवाद आणि संभाषणातील छोटय़ा घटकांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी काही अभ्यासात्मक पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. यासाठी मी अशोक रानडे यांचे भाषणरंग हे पुस्तक अभ्यासले. याचसोबत नाटय़शास्त्राचा अधिक उत्कृष्टरीत्या अभ्यास करण्यासाठी निरनिराळी पुस्तके मिळवून वाचली. शेक्स्पिअरचे हॅम्लेट, ऑथेल्लो, ज्युलिएट सीझर अशा सर्व चौदा नाटकांची पुस्तकेही मी वाचली. वि. वा. शिरवाडकरांची पुस्तके लहानपणीच माझ्या वाचनात आली. मी स्वत: सतार शिकत असल्याने शास्त्रीय संगीतावर आधारित काही पुस्तके मी अभ्यासपूर्ण वाचली. व्यस्त दिनक्रमामुळे वाचनासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा वेळी मी पहाटे उठून किंवा रात्रीच्या वेळी शांततेत वाचन करतो. काही जण पुस्तक घेऊन गेल्यावर परत आणून देत नाहीत, अशा वेळी ती पुस्तके गमावल्याबद्दल त्रास होतो. भाषणरंग आणि माझा हृदयविकार ही पुस्तके परत मिळाली नव्हती. तेव्हा खूप हळहळ वाटली होती. सध्या मी स्वसंमोहन या विषयावरील पुस्तके वाचत आहे.  वाचनाच्या माध्यमातून अभ्यास होत आहे. प्रत्येक पुस्तक हे आपल्याला एक वेगळी गोष्ट शिकवत असते. त्यामुळे विविध गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व प्रकारची पुस्तके नक्की वाचावीत, असे माझे मत आहे.