tv12आता ठाणे शहराचा परिसर प्रचंड गजबजला आहे. नवीन मिश्र वसाहती होत आहेत, त्याच्या आजूबाजूला त्या त्या धर्म पंथांच्या प्रभावाप्रमाणे देवळे, प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत; परंतु वर वर पाहता ठाण्याचे रंगरूप बदलू लागले आहे, असे जरी वाटत असले तरी ठाणे शहराचा मूळ स्वभाव त्यांचे अंतरंग एकच आहे ते म्हणजे सर्वधर्मसमभावाचे सर्वाना सामावून घेऊन आपले वेगळेपण जपण्याचे
ठाण्यातील धार्मिक स्थळांबद्दल लिहिताना प्रथम अग्रपूजेचा मान असलेल्या शिलाहारकालीन श्री कौपिनेश्वर मंदिरापासून सुरुवात करावी लागेल. ठाणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी इ.स. १७६० च्या सुमारास केला. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे बारा ज्योतिर्लिगच काय, उभ्या महाराष्ट्रात एवढय़ा मोठय़ा भव्य स्वरूपातील शिवलिंग कोठे पाहण्यात नाही. सध्या या मंदिराच्या आवारात मंदिरापुढील नंदीशिवाय सभागृहात गणपती, मारुती मंदिर, श्रीराम, कालिकामाता, श्री दत्त मंदिर, शीतलादेवी, उत्तरेश्वर यांना लागूनच पंचमहामुखी शिव आहे, तसेच काळभैरव, महाकाळश्वर आदींची मंदिरे असून कामधेनू, गरुड, विठ्ठल-रखुमाई यांच्याही मूर्तीची स्थापना येथे केली आहे. जणू समस्त ठाणेकरांची दैवते एकाकार होऊन कृपादृष्टीने ठाणेकरांना न्हाऊ घालीत आहेत.
पूर्वी कौपिनेश्वर मंदिर तलावाकाठी होते. सन १९५९ साली भराव टाकून मंदिरामागे महात्मा गांधी उद्यान व भाजी मार्केट आणि त्यापुढे मोठा रस्ता करण्यात आला. १९३९ च्या सुमारास या देवस्थानाची व्यवस्था पाहण्यासाठी श्री कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ६.४० वाजता व रात्री ७.३० वाजता सनई-चौघडावादन होते व रात्री ८.१५ वाजता सर्व देवळांतून सांजआरती केली जाते. संस्थेचे डॉ. प्र. वा. रेगे, नि. ल. भावे, द. पा. वैद्य, कै. शं. बा. मठ आदी विश्वस्त व इतरांच्या मार्गदर्शनाखाली शालिवाहन वर्षांरंभ करणाऱ्या चैत्र गुढी पाडव्याचा सण समस्त ठाणेकरांना सोबत घेऊन घर-अंगणात, चौका-चौकांत गुढी उभारून रांगोळ्या काढून सुशोभित रथयात्रेचे आयोजन केले जाते.
कौपिनेश्वर मंदिराच्या भोवताली अनेक मंदिरे इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. त्यात जांभळी नाक्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिर असून, त्याच्या पूर्वेला पेढय़ा मारुती खारकर आळीचे रक्षण करीत उभा आहे. येथून थोडय़ा अंतरावरील कलेक्टर ऑफिससमोर जांभळी नाका रोडवर श्रीरामाचे जुने मंदिर आहे. कौपिनेश्वर मंदिराच्या पूर्वेला बाजारपेठेत पुरातन मंदिरात समावेश होणारे विठ्ठल मंदिर इ. स. १८१७-१८ साली बहिणाबाई गोविंद यांनी बांधले. या मंदिरामध्ये रामेश्वर लिंग, विठ्ठल-रखुमाई आणि गणपती यांच्या मूर्तीची स्थापना केली. विठ्ठल-रखुमाईचे आणखी एक मंदिर ठाणे पूर्व येथे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या तलावाशेजारी आहे. स्टेशनजवळील चेंदणी कोळीवाडय़ातील दत्त मंदिर हेसुद्धा जुने जागृत देवस्थान कोळी बांधवांनी बांधले आहे. इ.स. १८३१ साली अक्कलकोट स्वामींचे शिष्य आनंद भारती महाराज (पूर्वाश्रमीचे पांडुरंग गुलाम नाखवा) यांचा जन्म झाला. त्यांनी इ.स. १८६६ ला श्री अक्कलकोट स्वामींच्या पादुकांची स्थापना करून मठ बांधले. याच जागेवर श्री आनंद भारती यांना १८८० साली दत्त मंदिराची स्थापना केली. पुढे श्री. आनंद भारती यांनी नौपाडा येथे १९०१ साली समाधी घेतली. कोळी लोकांच्या समाजाने ट्रस्ट स्थापून १९२० साली सध्याचे दत्त मंदिर उभारले. सध्या तेथे विजय खांबटे हे पुजारी आहेत. ठाण्यातील आणखी एक पुरातन मंदिर म्हणजे विठ्ठल सायन्न दत्त मंदिर. हे दमाणी इस्टेटसमोर असून नारायण विठ्ठल यादव यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त हे मंदिर १९१२ साली बांधले. याच वर्षी गोकुळ अष्टमीला मंदिरात दत्ताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १९८६ साली धनाजी नारायण यादव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात सर्व धार्मिक विधींसोबत गोकुळ अष्टमी, रामनवमी व दत्त जयंतीचा दहा दिवसांचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. विठ्ठल सायन्ना हे ठाण्याचे भूषण म्हणून इंग्रज काळात गणले जात. ते स्थापत्यविशारद होते. मुंबईचे जी. पी. ओ. कार्यालय, ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल व कळवा ब्रिजचे त्या काळात त्यांनी बांधकाम केले आहे.
इ.स. १८७९ च्या राजपत्रानुसार ठाण्यातील नऊ प्राचीन मंदिरांत कौपिनेश्वर मंदिरासह शक्तिदेवता घंटाळी देवीच्या मंदिराचाही त्यात उल्लेख आहे. पेशव्यांकडून या मंदिराला दरवर्षी चार रु. वर्षांसन मिळत असल्याचा उल्लेख सापडतो. मंदिराचे पुजारी जोशी बंधू हे गेली अनेक वर्षे मंदिराची व्यवस्था पाहत आले आहेत. हे मंदिर शक्तिदेवतेचे जागृत स्थान मानले जाते. मुख्य देवळाच्या गाभाऱ्याचे तीन भाग असून डाव्या बाजूला शिव, मधल्या भागात श्रीराम, तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी, घंटाळी देवी व दुर्गादेवी, अशा तीन मूर्ती आहेत. मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठय़ा थाटात केला जातो. तेव्हा समस्त भाविक ठाणेकर मोठय़ा श्रद्धेने येथे येतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या प्रांगणात ‘कैलाशपती’ नावाचा पुरातन वृक्ष असून याचे जे फूल उमलते ते शंकराच्या पिंडीसारखे दिसते. त्याचा सुवास सर्वत्र पसरतो, झाडाची पाने आणि बुंध्यापासून फांद्यापर्यंत शंकराच्या जटांसारख्या फुटलेल्या लहान पारंब्या यामुळे वृक्षाचे वेगळेपण आपल्याला आकर्षित करते. हा वृक्ष आता दुर्मीळ झाला आहे.
जुने ठाणे म्हणजे तलाव, मंदिरांचे ठाणे म्हणून प्रसिद्ध होते, सिद्धेश्वर तलावाच्या काठी श्रीराम मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी तलावाच्या काठी बांधकाम करीत असता इ.स. ९-१० व्या शतकातील ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीला चार मुखे आहेत, पण मूर्तीचे चारी हात कोपरापासून तुटले आहेत. असे जरी असले तरी सुंदर अंगकांती, नाजूक कलाकुसरीचे अलंकार आणि चेहऱ्यावरील विलोभनीय भाव पाहून आपले हात आपोआप जोडले जातात. सध्या ही मूर्ती उघडय़ा आभाळाखाली ऊन-पाऊस झेलीत उभी आहे. असेच तलावाकाठी असलेले कोलबाडमधील जागमाता वा शंकराचे मंदिर, गोकुळनगर येथील तलावाकाठचे जरीमरी आईचे देऊळ, जेल तलावाकाठी असलेले किल्ला मारुती, उपवन तलावाकाठी रेमंड वुलन मिलने बांधलेले सिद्धिविनायक मंदिर, शीलजवळील तलावाकाठचे खिडकाळी मंदिर, ओवळा, मोगरपाडा, वडवली येथील तलावात सापडलेल्या विष्णू व देवतांच्या मूर्ती, त्यातील शेषशाही विष्णू आता मंदिरात विराजमान झाला आहे. अशा अनेक ज्ञात-अज्ञात मंदिरांनी ठाण्याचे वैभव, धार्मिक सहिष्णुता वाढीस लागली.
ठाण्यातील उपवन, शिवाईनगरच्या बाजूला फार पूर्वीपासूनचे जानकादेवीचे जागृत देवस्थान आहे. पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात ठाणे काबीज केल्यावर ठाण्यात अंधारयुग अवतरले. पोर्तुगीजांच्या जबरदस्तीने धर्मछळ आणि बाटवाबाटवीने कळस गाठला. इथली मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली व त्या जागी प्रार्थनागृह वा चर्च बांधण्यात आले. त्याच्या भीतीने हिंदूंनी आपल्या देवदेवतांना विहिरी, तलाव वा भुईमातेच्या उदरी आसरा दिला. यांपैकीच जानकादेवी मंदिर आहे. या मंदिराच्या जागेवरच पोर्तुगीजांनी अवर लेडी मर्सी हे चर्च व गढी बांधली. पोर्तुगीज गेल्यानंतर ही जागा ओस पडली. सत्तरेक वर्षांपूर्वी स्वामी रामदासबाबा यांनी जानकादेवीची यथासांग पूजाअर्चा सुरू केली. जानकादेवी ही वर्तकनगर माजिवडे परिसराची ग्रामदेवता असून ती स्वयंभू आहे. अनेक भक्तांची ती कुलस्वामिनी आहे. जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे मंदिराची देखभाल करण्यात येते, तसेच प्रतिशिर्डी म्हणून अल्पावधीत प्रसिद्ध पावलेले वर्तकनगरमधील साईबाबा मंदिर पारसिकच्या डोंगरावरील
मुंब्रादेवी ही ऐन कडय़ाच्या पोटात असून, तेथे मुंब्रादेवीशिवाय सिद्धीमंगी, कालरात्री, चंद्रघटा, महागौरी, कात्यायनी, स्कंदमाता, शैलपुत्री, कुष्टमांडा अशा नऊ देवी येथे स्थानापन्न झाल्या आहेत. डोंगरावरील आणखी एक मराठेकालीन मंदिर गायमुख बंदराजवळ आहे. महादेवाच्या पिंडीवरील अभिषेक बाहेरील बाजूस गोमुखाद्वारे पडत असे म्हणून त्याला पूर्वापार गायमुख मंदिर असे म्हटले जाई. अलीकडे कुणा गुजराथी गृहस्थानी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, पायऱ्या, रस्ता, वीज-पाणी आणि मंदिरासह भव्य प्रांगण बनवून हे जागनाथाचे मंदिर खासगी मालमत्तेचे असल्याचा बोर्ड तेथे लावला आहे.ठाण्यातील हिंदू धर्मीय मंदिरांबरोबरच परधर्मीय प्रार्थनास्थळांनाही ऐतिहासिक महत्त्व व परंपरा लाभली आहे. ठाण्यातील जडणघडणीत त्यांचाही मोलाचा वाटा आहे. ठाण्यात झरतृष्ट्र धर्मीय पारशी लोकांची प्रार्थनास्थळे आहेत. ठाण्यात टेंभीनाका येथे पारशी लोकांनी धर्ममंदिर बांधले. त्यांना अग्यारी असे म्हटले जाते. या अग्यारीतून अग्नीची उपासना केली जाते. इ. स. १७८० साली केशवजी सोराबजी रुस्तम पटेल यांनी या अग्यारीची स्थापना केली. याची व्यवस्था ठाणे अग्यारीएन नावाची ट्रस्ट पाहते.
ज्यू लोकांचे बेने इस्रायल समाज मंदिर १८७९ साली बांधण्यात आले. शाआर हाश्शामाइस गेट ऑफ हेवन प्रार्थनालय असे या समाज मंदिराचे नाव असून, विद्यमान विश्वस्त सन्माननीय चिटणीस एग्रो मोजस हे इथली व्यवस्था पाहतात. गणपतीच्या सुमारास येणारा ‘सुक्कोथ सण’ हा ज्यू लोकांचा मोठा सण आहे, दुसरा ‘रोश होश्शाना हा हिब्रू कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. ज्यू धर्मात टेन कमांड (दहा आज्ञा)ला त्यांच्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे.
ख्रिस्ती धर्मीय प्रार्थनास्थळे इ. स. १६६३ साली पोर्तुगीजांनी प्रथम ठाण्याच्या मासुंदा तलावाकाठी सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्चचे बांधकाम केले. त्यानंतर इ. स. १८२५ साली किल्ला मारुती मंदिरामागील तलावाच्या पश्चिमेला इंग्रजांनी सेंट जेम्स चर्चची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्यानंतर इथला ख्रिस्ती समाज पूर्णपणे ठाणेकरांशी मिसळून गेला, दर रविवारी ते चर्चमध्ये एकत्र येतात. ख्रिसमसला सर्वधर्मीयांना आपल्या आनंदात सामील करून घेतात. ठाण्यात महागिरी कोळीवाडय़ातील जुम्मा मशीद ही साडेतीन वर्षांहून जुनी आहे. मुस्लीम समाज प्रामुख्याने खाडी किनारी स्थायिक झाल्याने महागिरी कोळीवाडा, राबोडी कासार वडवली, धोबीआळी, ओवळा, मुंब्रा या गावी त्यांच्या मशिदी आणि दर्गे आहेत. नुरीबाबा दर्गा हे हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे. नुरीबाबा हे सत्पुरुष दत्तभक्त होते. उथळसर ७ नंबर शालेसमोर बाबा हजरत हबीद वल्लाशहा काजरी यांचा दर्गा असून, मोहरमच्या दिवशी येथे मोठा उरूस भरतो तेव्हा सर्वधर्मीय लोक त्यात सामील होतात. टेंभीनाक्यावरील पारसनाथाचे जैन मंदिर प्रसिद्ध आहे. प्रवेशद्वारावरील दोन बाजूंचे प्रचंड हत्ती आणि आत भिंतीवर व छतावर वर्धमान राजाचे चित्ररूप जीवनचरित्र कोरले आहे. जैन धर्मीय टेंभीनाका नवरात्र उत्सवात सामील होतात.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा