सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी; रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डोंबिवली जिमखान्याने अपारंपरिक ऊर्जेची कास धरीत सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे जिमखाना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून येत्या रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

डोंबिवली जिमखान्यात तरणतलाव, टेबलटेनिस, बास्केटबॉल, कॅरम, बुद्धिबळ असे विविध खेळ खेळण्याची सुविधा आहे. जिमखान्याची एक नवी वास्तूही नुकतीच उभी राहिली आहे. सर्व गोष्टींचा वार्षिक खर्चाचा ताळमेळ पाहता खर्च लाखोंच्या घरात जात असून त्यात बचत कशी करता येईल, याविषयी जिमखान्याचे सदस्य विचारविनिमय करीत आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी ‘वॉटर फिल्टर प्लान्ट’ जिमखान्याच्या वतीने खूप आधीच बसविण्यात आला आहे. पाण्यासोबत विजेची बचतही करता आली तर हा विचार पुढे आला आणि सौरऊर्जेचा पर्याय सुचला. सर्व सदस्यांना ती योजना मान्य असल्याने जिमखान्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे सदस्य दीपक मेजारी यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे महावितरणच्या वीज निर्मितीतही बचत होणार असून खर्चही वाचणार आहे. महावितरणकडून आम्ही १५० च्या आसपास वीज वापरत होतो. सध्या महावितरण आम्हाला प्रतियुनिट १४.७५ पैसे दराने वीज देत आहे. वर्षभरात लाखो रुपये वीज बिलापोटी खर्च होतात. सौरऊर्जा आम्हाला ४ रुपये ६० पैसे किमतीने मिळत असून हा दर २५ वर्षे तोच राहणार आहे. त्यात कोणतीही वाढ होणार नाही. थोडक्यात सौरऊर्जेमुळे पैसे आणि वीज दोन्ही वाचणार असल्याचे दीपक मेजारी यांनी सांगितले.

एका खाजगी कंपनीसोबत २५ वर्षांचा करार करण्यात आला असून या प्रकल्प उभारणीसाठी आम्हाला एक रुपयाही खर्च आलेला नाही. कंपनीनेच सर्व खर्च केला असून त्याची देखभालदुरुस्तीही कंपनीच्या वतीने २५ वर्षे केली जाणार आहे. १०० किलोव्ॉटचे पॅनल सध्या आम्ही बसविले असून त्यातून ७० किलोव्ॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. भविष्यात ही वीजनिर्मिती २०० किलोव्ॉटपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे.  – दीपक मेजारी, सदस्य, डोंबिवली जिमखाना.