गावे वगळण्यासाठी आग्रही ग्रामस्थांचा इशारा; मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी मॅरेथॉनच्या खर्चावरही आक्षेप
येत्या रविवारी वसईत होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा उधळून लावण्याचा निर्धार पश्चिम पट्टय़ातील ग्रामस्थांनी केला आहे. वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यात आलेलीे नाहीत, पाण्याचा प्रश्नासह अनेक मूलभूत समस्या प्रलंबित असताना या महापौर मॅरेथॉन स्पर्धेवर कोटय़वधी रुपयांचा खर्च होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातारवण आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ही मॅरेथॉन स्पर्धा उधळून लावण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई-विरार महापालिका आयोजित ५ वी राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा रविवार, २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी किमान पंधरा हजार स्पर्धक सहभागीे होणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे स्पर्धक सहभागी होत आहेत. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा वेळी वसईच्या पश्चिम पट्टय़ातील शेकडो ग्रामस्थांनी या मॅरेथॉनच्या वेळी रास्ता रोको करून मॅरेथॉन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. पालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. जोपर्यंत ही गावे वगळलीे जात नाहीत तोपर्यंत मॅरेथॉन आमच्या गावातून जाऊ देणार नाही, असे निर्भय जनमंचने म्हटले आहे. कुठे मॅरेथॉन अडवायचीे त्या जागा गोपनीय असल्याचेही संघटनेचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो यांनी सांगितले. वाघोली येथीेल ग्रामस्थांनीही या स्पर्धेला विरोध करून ती उधळून लावणार असल्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. महापौर शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. ६९ गावांना पाणी देण्याची योजना भूमिपूजन करून अर्धवट सोडण्यात आली. गावातील पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. बांधकामांना गावातून बेकायदेशीर पाणी उपसा करून पाणी दिले जात आहे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. विजेचा प्रश्न, रस्ते, अल्पसंख्याक समुदायासाठी दफनभूमी आदी अनेक मूलभूत आणि पायाभूत समस्या पालिका सोडवू शकलेले नाही. राज्यात दुष्काळ आहे. मग महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च का, असा सवाल करत ही स्पर्धा रोखण्याचे वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य समीर वर्तक यांनी केला आहे. आम्हाला पालिका नको असताना आमच्या गावातून मॅरेथॉन स्पर्धा नेणे हा अपमान असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
माझ्याकडे अद्याप कुणी विरोध केलेला नाही. ही राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आहे. पण कुणी विरोध करत असेल तर त्यांचीे समजूत काढली जाईल.
प्रविणा ठाकूर, महापौर
वसई विरार महापालिका

वाघोलीतून विरोध कायम
गावे वगळण्याच्या प्रश्नावर वाघोली गावात हिंसक आंदोलन झाले होते. पोलिसांनी घराघरात घुसून ग्रामस्थांना अमानुष मारहाण केली होती. याच वाघोली गावातून विरोध होत असल्याने पोलिसांचीे मोठी कसोटी लागणार आहे.