ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बी केबिन परिसरातील कृष्णा निवास इमारत ५० हून अधिक वर्षे जुनी असली तरी महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याने येथे राहणारे निश्चिंत होते. पण सोमवारी सकाळी अचानक इमारतीचे प्लॅस्टर निखळू लागले. इमारतीला पायावर उभे ठेवणारे सिमेंटचे खांब काहीसे खिळखिळे झाल्यासारखे वाटत होते. पण तळमजल्यावर सुरू असलेले बांधकाम बंद करण्यापलीकडे या धोक्याच्या इशाऱ्याला कुणीही गांभीर्याने घेतले नाही.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे नौपाडय़ातील बी केबिन परिसरात कृष्णा निवास इमारत होती. १९६३ साली बांधण्यात आलेली ही इमारत तळ अधिक चार मजल्यांची होती. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. पण, त्यामध्ये या इमारतीचा समावेश नव्हता.  इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यात अमृतलाल पटेल यांचा चहा आणि कांदापोहे विक्रीचा व्यवसाय होता. उर्वरित दोन गाळ्यांत पिठाची गिरणी आणि सुताराची दुकाने  होती. पहिल्या मजल्यावर अमृतलाल पटेल, माधव बर्वे यांचे कुटुंब तर तिसऱ्या मजल्यावर अरुण सावंत, अरविंद नेने आणि रामचंद्र भट यांचे कुटूंब वास्तव्यास होते. इमारत जुनी होऊ लागल्याने अन्य कुटुंबे इतरत्र राहावयास गेली होती.
सोमवारी इमारतीच्या तळमजल्यावर बांधकाम सुरू होते आणि त्यावरून इमारतीतील रहिवाशांचा वाद झाला होता. या वादानंतर हे काम बंद करण्यात आले होते. याच दिवशी इमारतीच्या प्लॅस्टरचा काही भाग कोसळला. खरे तर ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा होती. मात्र, रहिवाशांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काळानेही या रहिवाशांना दुसरी संधी दिली नाही. मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास इमारत कोसळली आणि सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले.  यात १२ रहिवाशांचा मृत्यू झाला.
इमारत कोसळतानाच मोठा आवाज आणि सर्वत्र पसरलेली धूळ यांमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवासी पटकन बाहेर पडले. घटनेची वर्दी मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. तासभरातच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक दाखल झाले आणि त्यानंतर बचावकार्याला आणखी वेग आला. रात्रीची वेळ होती आणि फारशी गर्दी जमली नव्हती. वाहतुकीची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मदतकार्य सुरळीतपणे सुरू होते. मात्र, दिवस उजाडू लागल्याने बघ्यांची गर्दी जमू लागली. पण, परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे मदतकार्य विनाअडथळा सुरू होते.   राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. तर राजकीय नेत्यांनीही बचावकार्य करणाऱ्या तरुणांच्या नाश्त्याची सोय करून दिली.