tv13कल्याण-डोंबिवली परिसरात आगरी समाजाची मोठी वस्ती असली तरी आता काळाच्या ओघात हे शहर सामाजिकदृष्टय़ा संमिश्र झाले आहे. येथे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाचेही चांगलेच बस्तान आहे. त्यामुळे या सीकेपींची रसवंती तृप्त करण्यासाठी खास सीकेपी पद्धतीचे जेवन मिळणारी हॉटेलेही मुबलक आहेत. टिळक चौकातील चौबळ दाम्पत्याचे ‘सीकेपी मेजवानी’ हेही त्यापैकीच एक.
सीकेपी लोक खाण्याचे मोठे शौकीन. वालाचे बिरडे, बोंबलाचे भुजणे, खिम्याचे कानवले किंवा निनाव खावेत ते फक्त सीकेपींच्या घरात. रविवारी सीकेपी घरातील पुरुष मंडळी सकाळच्या वेळी तुम्हाला घरात चुकूनही सापडणार नाहीत. त्यांना शोधायचे म्हटले तर शहरातील चिकन स्टॉल किंवा फिश मार्केट पालथी घालावी लागतील. सीकेपी घरातील चवदार पदार्थ इतरांनाही चाखता यावेत या हेतूने डोंबिवलीतील अर्चना आणि अभिजीत चौबळ यांनी ‘सीकेपी मेजवानी’ नावाने शाकाहारी व मांसाहारी पदार्थाचे रेस्टॉरंन्ट गेल्या वर्षी सुरू केले. अगदी ताजी मच्छी तुम्हाला हवी असेल तर येथेच मासळी बाजारही उपलब्ध आहे. यामुळे खाणाऱ्या वारांच्या दिवशी (बुधवार, शुक्रवार, रविवार) येथे खवैय्यांची रांगच रांग लागलेली दिसते.  
हिंदुस्थान कंस्ट्रक्शनमध्ये नोकरी करणाऱ्या अर्चना यांनी ऑक्टोबर २०१३मध्ये सुरुवातीला मासळी बाजारची उभारणी येथील टिळक चौकात केली होती. नोकरी सोडून त्या आता पूर्णपणे या व्यवसायात उतरल्या असून त्या याविषयी म्हणतात, ‘‘सीकेपी महिलांची ओळखच मुळात सुगरण अशी आहे. मात्र त्यांच्यातील हा सुगरणीचा गुण सर्वासमोर यावा. सीकेपी जेवणाची चव सर्वानाच चाखता यावी, या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सीकेपी मेजवानी हे रेस्टॉरंन्ट सुरू केले.’’ पेशाने व्यावसायिक कलावंत असलेले त्यांचे पती अभिजीत चौबळ यांचीही त्यांना या कामी मोलाची साथ लाभली. प्रामुख्याने मालवणी, आगरी, ब्राह्मणी पद्धतीचे जेवण उपलब्ध असणाऱ्या अनेक खानावळी डोंबिवलीत आहेत. मात्र सीकेपी लोकांची मोठी वस्ती असूनही येथे सीकेपी पदार्थ मात्र कुठेही मिळत नाहीत. ‘मेजवानी’ने ती उणीव भरून काढली आहे.  
 ‘मेजवानी’मध्ये खवय्यांचे चोचले हमखास पुरविले जातात. स्पायसी विथ पातळ करी ही सीकेपी जेवणाची खासियत. मच्छी, मटणाचे कालवण चाखताना एक वेगळीच मजा येते. मांसाहारी अल्पोपहारामध्ये आंबोळे सोबत मटणाचा रस्सा, बोंबलाची भजी, खिमा पॅटिस, फिश कटलेट, जवळ्याची भजी येथे तुम्हाला भेटतील. दुपारच्या जेवणात चिकन रस्सा, मटण रस्सा, कोलंबी-बटाटा रस्सा, चिंबोरी रस्सा, सुरमई कालवण, रावस कालवण, पापलेट कालवण, हलवा कालवण, बोंबिल कालवण, तिसऱ्या मसाला, कोलंबी मसाला, जवळा मसाला, मटण कलेजी सुकी, चिकन कलेजी सुकी, मटण खिमा यांसोबतच चिकन थाळी, मटण थाळी व मासळी थाळीही उपलब्ध आहे. चिकन व मटण थाळीमध्ये चिकन – मटण रस्सा, २ चपाती किंवा १ भाकरी, भात, सोलकढी मिळेल. तर मासळी थालीमध्ये सुरमई, रावस रस्सा, १ फ्राय तुकडी, २ चपाती किंवा १ भाकरी, भात, सोलकढी मिळेल. कोलंबी व सोडय़ाच्या खिचडीचे वैशिष्टय़ विचाराल तर नारळाच्या दुधाचा त्यात वापर केला जातो. तसेच या रेस्टॉरंन्ट ची खासियत असलेले कॅरमल कस्टर्ड येथे मिळेल. कॅरमल पुडिंग सर्व ठिकाणी मिळते, त्यात अंडे व दुधाचा वापर केलेला असतो, मात्र हे शाकाहारी लोक खाऊ शकत  नाहीत. यामुळे त्यात थोडा बदल करीत कस्टर्ड पावडर व दुधाचे मिश्रण करून हा पदार्थ खास बनविला असून त्यास लोकांनीही पसंती दिली आहे. सर्वसाधारण मांसाहारी अन्न वज्र्य असणाऱ्या दिवशी अथवा शुद्ध शाकाहारींसाठी वालाचे बिरडे, मुगाचे बिरडे, वालाची खिचडी, वडीचा सांबार, भरली वांगी असे पदार्थ उपलब्ध आहेत. भाकरी, वडे किंवा चपाती  मिळेल. शेवग्याच्या शेंगांची आमटी, तसेच सीझनेबल शेवळाची भाजी येथे मिळते. शेवळाची भाजी पावसाळ्याच्या अगोदर बाजारात पाहायला मिळते, मात्र येथे ती साठवून ठेवली जाते. त्यात खिमा, सोडे घातलेली शेवळाच्या भाजीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळते. लहान मुलांसाठी खास येथे चिकन नगेट्स, चिकन फिंगर्स, चिकन पॉपकॉर्न आहेत. घरोघरी बनविला जाणारा मात्र हॉटेलमध्ये न मिळणारा पदार्थ म्हणजे निनाव हा सीकेपी पदार्थ. वर्षांच्या बाराही महिने खाल्ला जाणारा हा पदार्थही येथे तुम्हाला चाखता येईल. हे सर्व पदार्थ चाखल्यानंतर इथे आपली पंचंद्रिये तृप्त करायला सोलकढी आहेच..
शर्मिला वाळुंज

‘रेडी टु कुक’ मासे
आता जशा ‘रेडी टु कुक’ भाज्या सर्वत्र मिळू लागल्या आहेत, तसेच धुऊन, साफ केलेले मासे येथील बाजारात मिळतात. रोज सकाळी ससून डॉक येथून ताजे मासे आणले जातात. डोंबिवलीत नोकरदार महिला वर्ग जास्त असल्याने स्वच्छ, साफ केलेली तसेच मसाला लावलेल्या मच्छी, मटणाचे तुकडे किलोने घेऊन जाणे त्यांच्यासाठी सोयीचे असते.