लोकमान्यनगरमध्ये तीन महिन्यांतील चौथी घटना

लोकमान्यनगर परिसरातील वस्तीमधील पाच दुचाकी आणि एक रिक्षा जाळण्यात आल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. गेल्या तीन महिन्यांत लोकमान्यनगर परिसरातील वाहने जाळण्याची ही चौथी घटना आहे.

ठाणे येथील लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये राहणारे रामउजागीर रामसुभग यादव (३०) यांनी मंगळवारी रात्री आपली दुचाकी घराजवळच्या रस्त्यावर उभी केली होती. परंतु बुधवारी पहाटे ती जाळण्यात आली. या आगीत यादव यांच्यासह अन्य चार दुचाकी व रिक्षानेही पेट घेतला. पहाटेच्या सुमारास येथून जात असलेल्या एका रहिवाशाने इतर रहिवाशांना जागे केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. रहिवाशांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सहाही वाहने जळून खाक झाली होती.

लोकमान्यनगर पाडा नंबर ४ परिसरातील गेल्या तीन महिन्यांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वीच्या तीन घटनांमध्ये तीन दुचाकी आणि एक रिक्षा जाळण्यात आली आहे. पहाटेच्या वेळेस वाहन जाळण्याचे प्रकार घडत असून या प्रकारांमुळे नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा वर्तकनगर पोलिसांना अद्याप छडा लावता आलेला नाही. या संदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांच्याशी संपर्क साधला असता, तपास सुरू असल्याचे उत्तर त्यांनी दिले.