प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली रिक्षा, दुचाकींचा वापर अलीकडे पाणी वाहतुकीसाठी होऊ लागला आहे. दिवसभरात अनेक रिक्षाचालक प्लॅस्टिकचे पिंप, ड्रम्सच्या साहाय्याने विविध भागांत पाण्याची वाहतूक करताना दिसत आहेत. काही दुचाकीस्वारही ड्रमच्या साहाय्याने पाणी वाहतूक करीत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
सकाळच्या वेळेत घरातील स्त्रिया आजूबाजूच्या विहिरी, कूपनलिकांवर जाऊन हंडा, कळशी, बादल्यांच्या साहाय्याने पाणी भरून घरात पाणी साठवत आहेत. संध्याकाळनंतर कामावरून परतलेली चाकरमानी मंडळी घरातील पाण्याची गरज ओळखून आपली दुचाकी, चारचाकी काढून पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या कूपनलिकांवर गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. काही रहिवाशांनी आपल्या अस्वच्छ झालेल्या विहिरींची साफसफाई सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. विहिरीतील पाण्यात कचरा, घाण जाणार नाही याची दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.