रस्ता रुंदीकरणाचा पाणी योजनेला फटका
आधीच नायगावमध्ये पाण्याची टंचाई असतानाच आता रस्ता रुंदीकरणाचा फटका गावातील पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. महापालिकेने टाकलेल्या भूमिगत जलवाहिन्या रुंदीकरणाच्या कामामुळे उघडय़ावर पडल्या आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान तर झाले आहेच, त्याशिवाय नायगावमधील पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम झालेला आहे.
पाणीपुरवठा योजनेंतर्गत पालिकेने नायगाव स्थानक पूर्वेपासून बापाणे महामार्गापर्यंत भूमिगत जलवाहिन्या टाकल्या होत्या. २०११मध्ये या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. २०१४ मध्ये रस्ते विकास प्राधिकरणाने येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. त्या वेळी या भूमिगत जलवाहिन्या काढण्यात आल्या होत्या. रस्ता रुंदीकरण करताना त्या जलवाहिन्या पूर्ववत टाकणे आवश्यक होते, परंतु या कामात पालिका आणि रस्ते विकास प्राधिकरणात कसलाच समन्वय नसल्याने तसेच कामावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या जलवाहिन्या रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेने लाखो रुपये खर्च करून टाकलेल्या जलवाहिन्या वाया गेल्या आहेत. यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना रखडली आहे.
‘‘आम्ही गेली अनेक वर्षे पाण्याची वाट बघत होतो. जलवाहिन्या टाकल्याने पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती, परंतु या जलवाहिन्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाया गेल्याने आता आम्हाला पुन्हा पाण्याची वाट बघावी लागणार,’’ अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या जलवाहिन्यांचा खर्च पुन्हा कोण करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.