कल्याण पूर्व भागातील पुनालिंक रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पुनालिंक रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी रस्त्याखाली टाकण्यात येत असलेल्या वाहिन्या तुटक्या आहेत. या वाहिन्यांवर टाकण्यात आलेल्या खडीच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खडीमिश्रित सिमेंटचा लेप अतिशय चुकीच्या पद्धतीने टाकला जात असून ठेकेदार आणि महापालिकेचे या कामांवर लक्ष नसल्याने कामगार मन मानेल त्याप्रमाणे कामे करीत आहेत.

पुनालिंक रस्त्याच्या सिमेंटीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या खालचा थर तयार करण्याचे काम सुरू आहे. कमीत कमी सिमेंटचा वापर बांधकामासाठी व्हावा म्हणून सिमेंटचा अखंड लेप असेल तर त्यात कमी दर्जाची रेती आणि खडी टाकून ते काम पूर्ण करण्यात येत आहे.  सिमेंट रस्त्याचा खालचा थर पूर्ण करून प्रत्यक्ष वरचा थर पूर्ण झाल्यानंतर वरच्या दबावाने खालच्या निकृष्ट कामामुळे अख्खा रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.