कल्याणमधील घटना; पादचाऱ्यांची बघ्याची भूमिका
बँकेतून एक लाख रुपये काढून कार्यालयात निघालेल्या एका महिलेला लुटण्याचा चोरांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. या महिलेने पैशांचा बटवा घट्ट धरून चोरांशी समर्थपणे दोन हात केले. आपला प्रयत्न यशस्वी होत नाही, हे लक्षात येताच चोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला, आणि हे सर्व घडले भर रस्त्यात. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच बघ्याची भूमिका घेतली.
येथील शिवाजीनगरातील एका विकासकाच्या कार्यालयात नोकरीला असलेल्या ताराबाई जाधव (५५) कार्यालयीन कामकाजासाठी गुरुवारी बँक ऑफ बडोदाच्या येथील शाखेत एक लाख रुपये काढण्यासाठी आल्या होत्या. पैसे काढून झाल्यानंतर त्या बँकेच्या बाहेर पडल्या. चोरीच्या उद्देशाने बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या दोघा तरुणांनी दुचाकीवरून येत ताराबाईंच्या अंगावर खाजकुइली टाकली. त्यामुळे भर रस्त्यात ताराबाईंना अस्वस्थ वाटू लागले. चोरांनी त्यांच्याकडील पैशांचा बटवा हिसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु ताराबाईंनी त्यांना जोरदार प्रतिकार केल्यावर ते पळून गेले.