आता सराईत सोनसाखळी चोरटेही गुन्हे करण्यासाठी विविध राज्यांमध्ये विमानाने प्रवास करू लागल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून पुढे आली आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अशीच एक टोळी जेरबंद केली असून तपासादरम्यान टोळीचे ठाणे-मुंबई व्हाया दिल्ली विमान प्रवासाचे कारनामे पुढे आले आहेत. याशिवाय, चेन्नई आणि हैदराबादमध्येही या टोळीने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांसाठी असाच विमानप्रवास केल्याची बाब समोर आली आहे. तसेच पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून चोरीसाठी निवडलेल्या राज्यामधील बडय़ा हॉटेलमध्ये हे चोरटे एखाद्या उद्योजकाप्रमाणे वास्तव्य करीत असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे.
मोहम्मद ऊर्फ आन्डू अफसेर सैयद इराणी (२५), अजिज जाफर सैयद (३२) आणि मुक्तार शेरू सैयद (२३) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील तिघांची नावे आहेत. हे सर्व जण कल्याणमधील आंबिवली भागात राहतात. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये सोनसाखळी चोरटय़ांनी हैदोस घातला होता. वर्षभरापूर्वी आयुक्तपदावर रजू झालेले परमबीर सिंग यांनी सोनसाखळी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. ठाणे गुन्हे शाखेची विशेष पथके काही महिन्यांपासून चोरटय़ांचा माग काढत होती. मोहम्मद, अजीज आणि मुख्तार या तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले.