tvlog01त्यापेक्षा वेगळी अशी चव तरुणाईला चाखायची असते. मग त्यांची पावले वळतात ते पिझ्झा हट, चॉकलेट कॅफे आणि साऊ थ इंडियन डिशकडे. यापेक्षाही वेगळे हवे असल्यास मग इटालियन फूडला हल्ली पसंती दिली जात आहे. तरुणाईची हीच आवड ओळखून इटालियन, तिबेटीयन आणि मॅक्सिकन या तिन्ही ठिकाणच्या पदार्थाची चव चाखायची संधी कल्याणमधील रोसो कॅफेने उपलब्ध केली आहे. चॉकलेट फ्लेवरमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थाची चव तुमच्या जिभेवर कायम रेंगाळत राहते आणि पुन:पुन्हा या कॅफेमध्ये जाण्यास प्रवृत्त करते.
कल्याण पश्चिम येथील कर्णिक रोडवरील रोसो कॅफे सध्या कल्याणकरांचे लक्ष वेधून घेत आहे. तरुणाईला भुरळ घालणाऱ्या विविध पदार्थाना जर गाण्यांच्या सुरावटीची साथ मिळाली तर दुधात साखर पडल्याचा आनंद असतो. येथे खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या पदार्थाची मेजनानी उपलब्ध आहे. चॉकलेट पिझ्झा हा आगळावेगळा पदार्थ तुम्हाला येथे खायला मिळेल. आतापर्यंत चॉकलेट पिझ्झाचा प्रयत्न कुणीच केलेला नाही. तरुणाईचा जास्तीत जास्त कल चॉकलेटचे पदार्थ खाण्याकडे असतो. त्याला अनुसरून चॉकलेटचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चॉकलेट पिझ्झा हा त्यातलाच एक प्रकार आहे. पिझ्झावर चॉकलेट मेल्ट करून त्यावर कॉर्नने सजविले जाते. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण याची चव चाखण्यासाठी येथे येतात. शिवाय चॉकलेट मोमोज, चॉकलेट मिल्कशेक येथे तुम्हाला मिळेल. यासोबत मॅक्सिकन साल्सा मोमोज, तिबेटीयन फूड असलेले कॅप्सिकन मोमोजही मिळतील. इटालियन व्हेज पास्तामध्ये अलफ्रेडो पास्ता, अलफुंगी पास्ता आणि रोसो कॅफेचा स्पेशल पास्ता येथे मिळतो.
मांसाहारी पदार्थामध्ये इटालियन क्रिमी चिकन, स्पायसी चिकन आणि रोसो स्पेशल चिकन पास्ता येथे उपलब्ध आहे. पास्ता, पिझ्झा, मोमोजसोबत मिळणारी हिरवी-लाल चटणी, सफेद-लाल सॉस ही रोसो कॅफेची खासियत आहे. फ्राइड राइस तर आपण नेहमीच खातो. त्यातही येथे इमली फ्रेंच फ्राइड राइस मिळतो. अननस व नारळ यांचे मिश्रण असलेला पिना पोलॅडा मिल्कशेकची चव तुम्ही एकदा चाखाल तर वारंवार येथे याल. मँगोलिची मॉकटेल हा तरुणाईचा आवडीचा पदार्थ आहे. इटालियन पदार्थाची एकत्र चव चाखायची असेल तर व्हेज कोंबो व नॉनव्हेज कोंबोचा पर्याय आहे. शाकाहारीमध्ये तंदुरी पनीर पिझ्झा, गार्लिक ब्रेड, ग्रीन अ‍ॅपल मजिटो ही एक थाळी व पास्ता रोसो, प्लेन गार्लिक ब्रेड, चॉकलेट शेक हे एकत्र १७५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच मांसाहारीमध्ये १७० रुपयांत तुम्हाला रेड सॉस पास्ता, स्पायसी चिली फ्राईस, मँगो लिटची कूलर हे पदार्थ मिळतील. तंदुरी चिकन पिझ्झा, चॉकलेट शेक व क्लासिक सॉल्टेड फ्राईज २१२ रुपयांत उपलब्ध आहे. खिशाला परवडणाऱ्या किमतीत हे पदार्थ उपलब्ध असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी येथे जास्त गर्दी करतात. येथील चॉकलेट पिझ्झा, चॉकलेट सॅण्डविच आणि इटालियन पास्ता आम्हाला खूप आवडला. पूर्ण कुटुंबासाठी किंवा मित्रमंडळींना पार्टी देण्यासाठी हे एक वेगळे व उत्तम ठिकाण आहे. येथील पदार्थाची चव तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना चाखवली तर तेही खूप खूश होतील, असे येथे येणारे अरविंद शिंदे सांगतात.
हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या महेश बनकर यांनी हे कॅफे सुरू केले असून त्यांचे मित्र अविनाश वालेकर व तिलक बिष्ट हे त्यांना यात मदत करीत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाचे पद्धतशीर शिक्षण घेतल्यानंतर कल्याण येथील जनतेला जरा हटके काही तरी पदार्थ देण्याचा विचार करीत होतो. अनेक महिने याचा अभ्यास केल्यावर इटालियन फूड ठाण्याच्या पुढे फारसे कुठे मिळत नाही, हे लक्षात आले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांना इटालियन फूडची चव येथेच चाखता यावी व त्यातही काही नावीन्य असावे या हेतून हे कॅफे सुरू केले, असे विश्वास महेश बनकर यांनी सांगितले.

रोसो कॅफे
स्थळ : रोसो कॅफे, शॉप नं १, रितेश टॉवर, राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळ, एमएससीबी कार्यालयाच्या समोर, कर्णिक रोड, कल्याण (प.)
वेळ : सकाळी ११ ते रात्री ११

शर्मिला वाळुंज