ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटालगत दोन हजार दुचाकींसाठी पार्किंगची सोय असलेली ‘पार्किंग प्लाझा’ इमारत उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर या पार्किंग प्लाझाच्या श्रेयवादाला सुरुवात झाली असून बॅनरच्या माध्यमातून ठाण्याचे खासदार राजन विचारे, माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांनी ‘आपआपले’ प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या बॅनरबाजीमुळे स्थानक परिसरातून चालताना प्रवाशांना बॅनरचा अडथळा पार करावा लागत असून त्यामुळे स्थानक परिसराचे विद्रुपीकरणही झाले आहे.
कामाचे श्रेय दाखवण्यासाठी फलक हा लोकप्रतिनिधींचे आवडते माध्यम बनले असून न्यायालयाच्या आदेशानंतरही बॅनरबाजी कमी करण्याचा कोणता प्रयत्न त्यांच्याकडून केला जात नाही. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शहरातील बॅनरबाजी कमी झाली, पण स्थानक परिसराला सध्या पुन्हा बॅनरबाजी सुरू झाली आहे, तीही पार्किंग प्लाझा या इमारतीचे श्रेय घेण्यासाठी. विद्यमान खासदार, माजी खासदार आणि आमदार अशा लोकप्रतिनिधींचाच प्रामुख्याने त्यात सहभाग असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
tv09ठाणे स्थानकातील पार्किंग प्लाझाची अत्यंत जुनी मागणी असली तरी रेल्वेच्या अडमुठेपणामुळे पार्किंगकोंडी कायम होती. त्यासाठी आमदार, खासदारांकडून सततची मागणी पत्रे पाठवली जात होती. या लोकप्रतिनिधींबरोबरच शहरातील प्रवासी संघटनांचाही पार्किंगसाठी व्यवस्था व्हावी, अशी मागणी लावून धरली होती. त्याला अखेर मंजुरी मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्याच पत्रामुळे ही मंजुरी मिळाल्याच्या आर्विभावात फलकबाजी सुरू केली आहे. सॅटिसच्या खांबांचा आधार घेऊन, सॅटीसच्या जिन्यांच्या ठिकाणी हे फलक बांधण्यात आले आहे. पार्किंग प्लाझामुळे प्रवाशांना पार्किंगची चांगली सुविधा होणार असली तरी बॅनरमुळे मात्र नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पार्किंग हवे पण बॅनरबाजी थांबवा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.