१५ दिवसांनंतरही बोधचिन्हापलीकडे काहीच तपशील नसल्याने संतापाचा सूर

साहित्य संमेलनात तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून मोठय़ा प्रमाणात सोशल माध्यमांचा वापर करणे अपरिहार्य असले तरी सध्या मात्र या माध्यमांतील अशा प्रकारच्या उपक्रमांचा वावर दिखाऊ पद्धतीचाच आहे. डोंबिवली येथे फेब्रुवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही स्वतंत्र फेसबुक पेज तयार करण्यात आले. मात्र १५ दिवसांनंतरही या पेजवर संमेलनाच्या बोधचिन्हापलीकडे कोणतीही माहिती दिलेली नाही.

डोंबिवली शहरात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलडोंबिवली शहरात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.न होत आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात हे संमेलन होत असल्याने हे संमेलनही हायटेक स्वरूपाचे व्हावे, अशी मते अनेक जाणकारांनी व्यक्त केली होती. तरुणाईचा ओढा हल्ली सोशल नेटवर्किंग साइटस्कडे दिसून येतो. शहरात होत असणाऱ्या घडामोडी त्वरित मोबाइल अथवा टॅबवर सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात शहरात होणाऱ्या साहित्य संमेलनाचीही माहिती तरुणांना त्वरित उपलब्ध व्हावी, म्हणून समितीच्या वतीने फेसबुक या सोशल मीडियाच्या साइटवर ‘९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे’ खाते उघडण्यात आले आहे. या पेजवर केवळ साहित्य संमेलनाचे फक्त बोधचिन्हच आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहे. संमेलनाच्या निमित्ताने आयोजन समितीने घेतलेल्या बैठका, साहित्य संमेलनामध्ये मांडण्यात येणारे विषय आदी माहिती टाकण्यात आलेली नाही.

तरुणांचा हिरमोड

साहित्य संमेलनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण या साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवर जातात, परंतू त्यावर कोणतीही माहिती अपडेट नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या संमेलनाला आता अवघा दीड महिना उरलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संमेलनाची रूपरेषा आणि त्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती मिळाली तर नक्कीच यामध्ये सहभागी व्हावे, अशी आवड तरुणांमध्ये निर्माण होईल. फेसबुकसोबतच यूटय़ूब चॅनल, ट्विटर हॅण्डल आदी माध्यमांतूनही या संमेलनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. या माध्यमातून तरुणांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

साहित्य संमेलनाचे फेसबुक पेज नुकतेच तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यावर संमेलनाविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी, माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. संमेलनाचे संकेतस्थळही तयार करण्याचे काम सुरूआहे. इंटरनेटच्या माध्यमातून तरुणांशी जोडण्याचा आमचा सुरुवातीपासून प्रयत्न आहे.

गुलाब वझे,अध्यक्ष, आगरी युथ फोरम