समीरा गुजर,अभिनेत्री, सूत्रसंचालक

बालपण हा कोणत्याही लहान मुलावर संस्कार करण्याचा सगळ्यात योग्य काळ असतो. त्या वयातील मुलांची मने संस्कारक्षम असतात. अशा वेळी जर त्यांना योग्य संगत लाभली, चांगले विचार त्यांच्या मनावर कोरले गेले, तर त्या मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून चांगली संगत मिळाली. त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे पुस्तके. पहिलीपासून मला वाचनाची अतिशय आवड होती. माझा वाचन छंद जोपासण्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या वाचनात जे काही चांगले येत असायचे ते त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवले. वाचनालयाचे सभासदत्वही मी आईच्या नावाने घेतले होते, जेणेकरून त्या वयात केवळ बालसाहित्य नव्हे तर मोठय़ांची पुस्तकेही मला वाचता आली.

सहावीत होते तेव्हा त्या वयात शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’, ना.स. इनामदार यांची ‘मंत्रावेगळा’ या ऐतिहासिक कादंबऱ्या, गो.नी. दांडेकर यांचे ‘बया दार उघड’ ही पुस्तके वाचली व ती मनाला भावलीसुद्धा. शाळेतल्या बापटबाई आणि ‘जिज्ञासा’चे दिघे सर यांनी माझ्या वाचनाला दिशा दिली. जिज्ञासाच्या वाचनालयात मी ‘तमस’ ही कादंबरी वाचली. जसजसा माझा वाचनाचा छंद वाढत गेला, तशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, आपल्या वाचनाला शिस्त हवी. त्यामुळे मी अरुण टिकेकर यांचं ‘वाचन कसं कराव’ हे ग्रंथांवरचे पुस्तक वाचले, जे मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते.

पुस्तक मिळण्याचे अनेक स्रोत होते. काही वाचनालयातून मिळायची, काही बक्षिसांमध्ये मिळायची, काही विकत घ्यायची. मात्र बाबांनी लहानपणापासूनच एक सवय लावली होती की, रद्दीच्या दुकानात जायचं आणि लोकांनी जी पुस्तकं रद्दीत टाकून दिली आहेत त्यातील चांगले पुस्तक निवडून आणायचे. माझी लहानपणापासूनच इच्छा होती की, आपल्याकडे एन्सायक्लोपीडियाचे खंड असावेत. कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही, पण एन्सायक्लोपीडियाचे काही खंड मला रद्दीतूनच मिळाले. सुहासिनी मुळगावकरांचं ‘सफर’ हे प्रवासवर्णन, संस्कृतमधील ब्रह्मपुराणाच्या १८ खंडांपैकी ८ खंडही मला रद्दीतूनच मिळाले.

माझे ललित वाचन कमी आणि वैचारिक व समीक्षात्मक वाचन जास्त आहे. त्यात मला दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, शांताबाई शेळके यांचे लेखन वाचायला आवडते. स्तंभलेखन किंवा लेख हे वाचायला फार वेळ मिळत नसेल तर सोयीचे ठरतात. दुर्गा भागवत यांचा ‘भाकरी’ हा लेख उत्तम आहे. शांता शेळके यांचे स्तंभलेखन वाचूनच मला स्तंभलेखन करावेसे वाटले आणि ‘लोकसत्ता’मध्येच मी माझे पहिले स्तंभलेखन सुरू केले.

आजच्या घडीला माझ्या घरात अनेक पुस्तके आहेत. माझ्याकडे दोन बुकशेल्फ आहेत. त्यात आठशे-हजारपेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यामधील ‘सावरकरांचे समग्र साहित्य’, ‘संस्कृत संस्कृतिशास्त्र’, पु. ल. देशपांडे यांची ‘सृजनाहो’, ‘श्रोतेहो’ ही पुस्तके त्याचप्रमाणे पुलंचे ‘भाषणसंग्रह’, शांताबाई शेळके यांचे ‘स्तंभलेखन’, ‘नक्षत्रव्याध’, ‘एकपानी’, ‘नाटय़शास्त्राचे खंड’, मंगेश पाडगावकर यांचे ‘बोलगाणी’, ‘जिप्सी’ आणि इतर काव्यसंग्रह, सुधीर मोघे यांचे ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘शब्दधन’ हे काव्यसंग्रह आणि ‘ज्ञानेश्वरी’ ही पुस्तके मला सतत लागतात. ती पुस्तके मी केव्हाही वाचू शकते.

मालिकांच्या सेटवरही मी मोकळ्या वेळेत वाचन करत असे. सेटवर कलाकारांमध्ये पुस्तकांवर चर्चाही होतात. एका ठिकाणी काम करत असताना माझी माधुरी शानबाग यांच्याशी ओळख झाली. मी त्यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांबद्दल ऐकले आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला. मग मी परत त्यांचे सगळे कथासंग्रह वाचले. त्या वेळी मला ते नव्याने समजले.

मी पुस्तकांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे. मी पुस्तक सुचवते, पण माझी प्रत कोणालाही देत नाही. लोक मला भेट म्हणून पुस्तक देतात, तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा असतो. पनवेलचे माझे एक मित्र खास मला पुस्तक देण्यासाठी ठाण्याला इतक्या लांब येतात. दर वेळी येताना चार-पाच पुस्तके घेऊन येतात. अशी माणसे आजूबाजूला असणे हीच माझी खरी श्रीमंती आहे.

माझी वाचनाची आवड हळूहळू बदलत गेली. विरंगुळा ते जीवनाचा अविभाज्य भाग असा माझ्या वाचनाचा प्रवास आहे. मला प्रोत्साहनपर आत्मचरित्रे वाचायला आवडतात. आंद्रे आगाशे यांचे ‘ओपेन’ हे आत्मचरित्र खरेच सुंदर आहे. अभ्यास करणे, माहिती मिळवणे आणि प्रोत्साहन ही माझ्या वाचनामागची उद्दिष्टे आहेत.

मला मनोरंजनासाठीसुद्धा वाचनच करायला आवडते आणि अशा वेळी मी व्हॉट्सअ‍ॅप वाचन करते. म्हणजेच त्यावर आलेले चांगले मेसेज किंवा विनोद वाचते. माझ्यासाठी पुस्तकांशिवाय आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मी म्हणेन की, ‘‘आय कॅन लिव विदाऊट माय मोबाइल बट नॉट विदाऊट माय बुक्स.’’