अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर चार दिवसांत बेसुमार उत्खनन
ठाण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या धडाक्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भूमिगत झालेल्या रेतीमाफियांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून कोपरपासून मुंब्य्रापर्यंतच्या खाडीत गेल्या तीन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेतीउपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे, जोशी यांच्या बदलीचा आनंद साजरा करण्यासाठी काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रेतीउत्खननास सुरुवात करण्यात आल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनाऱ्यांवर तिवरांच्या जंगलांची अमानुष कत्तल करत बेसुमार रेती उपशा करणाऱ्या माफियांची वर्षांनुवर्षे दहशत राहिली आहे. आबासाहेब जऱ्हाड, वेलासरू या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तर या माफियांनी टोक गाठले होते. डॉ. अश्विनी जोशी यांनी मात्र गेल्या वर्षभरात वाळू तस्करांना जेरीस आणले. तलाठी, तहसीलदार कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कामाला लावत डॉ. जोशी यांनी या माफियांचे कंबरडे मोडले होते. मात्र गेल्या गुरुवारी रात्री त्यांची बदली होताच मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, दिवा, कोपर, कोन, भिवंडी परिसरात खाडीकिनारी जोरदार रेतीचा उपसा सुरू झाला असून यामुळे स्थानिक ग्रामस्थ चक्रावून गेले आहेत.
सक्शन पंप, रेती वाहतूक करणाऱ्या बोटी, बोटीवर पुरेसे धान्य, पाणीसाठा, केरोसीनवर पेटणारे कंदील असा जामानिमा घेऊन तस्करांच्या बोटी मुंब्रा परिसरातील खाडीत पुन्हा विराजमान झाल्याचे चित्र दिसत आहे. जोशी यांच्यामुळे रेती उपशाचा बेकायदा आर्थिक स्रोत बंद झाला होता. त्यामुळे खाडीत बोटी सोडताना काही ठिकाणी चक्क फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. गेल्या तीन महिन्यांचा आर्थिक खड्डा भरून काढण्यासाठी वखवखलेल्या तस्करांनी रात्रंदिवस वाळू उपशाचा धडाका लावला आहे. आळीपाळीने कामगार या बोटींवर काम करीत आहेत. रात्रीच्या वेळेत वाळू उपसा सुरू आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये, म्हणून मंद ज्योतीमधील केरोसीनचे कंदील पेटवून वाळू उपसा करण्यात येत आहे.