डोंबिवली खाडीकिनारी बेकायदा रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. रात्रीच्या वेळेत खाडीतून बेकायदा उपसा करून, पहाटेपर्यंत रेती गायब करायची, अशी या रेतीमाफियांची गेल्या काही महिन्यांपासूनची खेळी होती. ती महसूल अधिकाऱ्यांनी मोडून काढली आहे.
विकास कोळी, बारक्या दळवी, राजू राठोड, संतोष साळुंखे, अजय पाटील अशी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या रेतीमाफियांची नावे आहेत. या रेतीमाफियांनी खाडीतून ५०९ ब्रास रेती काढली होती. ३५ लाखाचा हा रेतीसाठा आहे. दरम्यान, उमेशनगरमध्ये टपाल इमारतीच्या बाजूला सापडलेला रेती साठा २०० डम्पर असूनही मंडळ अधिकारी प्रल्हाद खेडकर यांनी तो फक्त ३५ ब्रास दाखवून, रेती व्यावसायिक दिलीप भोईर यांना १४ लाखाचा दंड ठोठावला होता. याविषयी सामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना रेतीमाफियांचे उद्योग माहिती असूनही, या माफियांशी महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने अनेक वर्षे या रेतीमाफियांवर महसूल विभागाकडून कारवाई केली जात नव्हती.
जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना महसूल विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची गुपिते कळल्याने, त्यांनी स्वत:हून या कारवाईत पुढाकार घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांची वर्षांनुवर्षांची ‘दुकाने’ बंद पाडल्याची चर्चा रेती व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.