अवैध रेतीवाहतूक करणारी २२८ वाहने जप्त

जिल्हा प्रशासनाकडून कोटय़वधीची  दंडवसुली

राज्य सरकारचा अकृषिक कर थकविणाऱ्या उद्योजकांच्या मुसक्या आवळण्याची मोठी मोहीम सुरू करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्य़ातील अवैध गौणखनिज वाहतूक करणारे वाहतूकदार तसेच बडय़ा बिल्डरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. गेल्या पंधरवडय़ात तब्बल २२८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्हा प्रशासनाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून गौण खनिज उत्खननप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडाला काही मोठय़ा बिल्डरांनी आव्हान दिल्याने याप्रकरणी नवा वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर ही तिन्ही शहरे ठाणे तहसील विभागाच्या अखत्यारित येतात. काही दिवसांपूर्वी सरकारचा अकृषिक कर थकविणाऱ्या खासगी आणि शासकीय आस्थापनांना महसूल विभागाने नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतरही कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने गेल्या आठवडय़ात कारवाई सुरू केली होती. ही  कारवाई ताजी असताना गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांविरोधात आता जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ, मुरबाड या भागात गेल्या पंधरवडय़ापासून सुरू असलेल्या कारवाईत अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारी २२८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही वाहने रचून ठेवण्यात आली असून काही वाहने संबंधित पोलीस ठाण्यांकडे जमा करण्यात आली आहेत. ही अवैध वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून पुन्हा अशी वाहतूक होऊ नये यासाठी दंड आकारला जात असून यापुढे असे आढल्यास संबंधित वाहन शासनाकडे जमा केले जाईल, अशी बंधपत्रे लिहून घेतली जात आहेत, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्याने दिली. अवैध वाहतुकीसंबंधी आकारण्यात आलेल्या दंडाची वसुली केल्यानंतरच ही वाहने सोडून दिली जातील, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२७४७ रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

७,०५,१८,००० रुपयांचा दंड वसूल

प्रथमच मोठी कारवाई

ठाणे जिल्ह्य़ात रेती, खडी किंवा तत्सम गौण खनिजाचे उत्खनन करणे किंवा वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाची रीतसर परवानगी आणि परवान्यांची आवश्यकता असते. मात्र, कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे गौण खनिजांची वाहतूक आता नित्याची बनली असून, वाहतूक शाखा आणि महसूल विभागातील भ्रष्ट यंत्रणांचा अशा वाहतूकदारांना अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा नित्याची बनली आहे. वर्षभर वाहतूक विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून अशा वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असली तरी वाहतुकीचे एकंदर प्रमाण पाहता कारवाईचे प्रमाण फारच क्षुल्लक असल्याचे बोलले जाते. मात्र, गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रेतीमाफियांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.