केंद्र शासनाच्या घोषणेनंतर तसेच राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याच्या परिपत्रकानुसार कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेची हाक दिली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत सुरू केलेल्या मोहिमेत शहरात विशेष स्वच्छता झाली नव्हती. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेले हे अभियान कितपत यशस्वी होईल, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने देशभरात भारत स्वच्छता अभियान सुरू केले. या योजनेचा दुसरा टप्पा म्हणून केंद्र शासनाने यावर्षी २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०१५ या दिनापर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेची हाक देशाला दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनानेही स्वच्छता अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना ही मोहीम राबविण्यासाठीचे परिपत्रक दिले असून बदलापूर नगरपालिकेने ही मोहीम राबविण्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अभियानाअंतर्गत बदलापूर शहरात ठोस अशी कार्यवाही होत असल्याचे चित्र अपवादानेच दिसत आहे. घंटा गाडय़ांची अनियमितता, सफाई कर्मचाऱ्यांची कुचराई या समस्याच गेल्या वर्षभरात समोर आल्या असून काही विद्यमान लोकप्रतिनिधींनी या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नगरपालिका यंदा हे अभियान पूर्ण क्षमतेने राबविणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.