घरात एखादी वस्तू घ्यायची म्हटली की, त्यासाठी दरमहा ठरावीक रक्कम साठवून सणासुदीच्या मुहूर्तावर ही खरेदी केली जायची. मात्र, आता बदलत्या काळानुसार आधी वस्तू घ्या आणि मग पैसे भरा अशी सुलभ हप्त्यांच्या योजनांची बाजारात सर्वत्र चलती आहे. अगदी घरापासून मोबाइलपर्यंतच्या गोष्टी अशा सुलभ हप्त्यांत उपलब्ध आहेत. मात्र, यात आता स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साडय़ांचीही भर पडली आहे. भरजरी, खास नक्षीकाम अथवा कलाकुसर असलेल्या साडय़ांच्या भरमसाट किमती सर्वसामान्यांना परवडाव्यात म्हणून आता मोठमोठय़ा दुकानांनी चक्क सुलभ हप्त्यांत साडीखरेदीची योजना चालवली आहे. यासाठी वित्तीय कंपन्यांची मदत घेतली जात असून दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही योजना दुकानदारांसोबत ग्राहकांच्याही पथ्यावर पडत आहे.

साडी हे भारतीय संस्कृतीचे एक लक्षण आहे. आजकालच्या जमान्यात साडीचा दैनंदिन वापर काहीसा कमी झाला असला तरी, सणासुदीला किंवा सोहळा-समारंभांना साडीलाच महिलावर्गाची पसंती असते. त्यामुळे बाजारात भरजरी आणि खास कलाकुसर असलेल्या महागडय़ा साडय़ांची विशेष चलती आहे. अगदी पाच हजारांपासून ५० हजारांपर्यंतच्या साडय़ा मुंबई-ठाण्यातील मोठमोठय़ा दुकानांमध्ये विक्रीस उपलब्ध असतात. मात्र, अशा साडय़ा एकरकमी खरेदी करणे सामान्यांना परवडत नाही. अशा वेळी  हिरमुसल्या जाणाऱ्या महिलांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी सुलभ हप्त्यांत साडीविक्री सुरू केली आहे.

ठाण्यातील एका साडय़ांच्या दुकानात अशी योजना सुरू झाली आहे. एका वित्तीय कंपनीच्या सहकार्यातून या दुकानाने सुलभ हप्त्यांमध्ये साडीविक्री सुरू केली आहे. त्यासाठी शून्य टक्के व्याजदर आकारण्यात येत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. केवळ ग्राहकांना वित्तीय कंपनीकडे प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.

‘वित्तीय कंपन्यामुळे एकही रुपया न देता हवे तेव्हा हवे ते खरेदी करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे या व्यवहारात कोणतेही व्याज आकारले जात नाही,’ अशी माहिती ही योजना राबवणाऱ्या वेदेसा शोरूमच्या शीला चौरे यांनी दिली. पाच हजारांच्या पुढील खरेदीवर हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. पाच ते सात हजारांची खरेदी केल्यास तीन महिन्यांच्या कालावधीत परतफेड करावी लागते. त्यावरील खरेदीवर दहा ते बारा महिन्यांचा कालावधी दिला जातो.

क्रेडिट कार्डला पर्याय

उच्चवर्गीयांकडे क्रेडिट कार्डाची सोय असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी सहज शक्य होतात. लहान आणि मोठय़ा अशा दोन्ही खरेदींत ते वापरता येतात. यामध्ये काही वेळा ३० किंवा ४५ दिवसांच्या आत सर्व पैसे फेडावे लागतात. मात्र मध्यमवर्गीयांना अजूनही ‘कर्ज’ या शब्दाची खूप धास्ती वाटते. अशा ग्राहकांसाठी वित्तीय कंपन्यांची ही योजना उपयुक्त ठरत आहे. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाते व नंतर ग्राहकाच्या खात्यातून दरमहा ठरावीक रक्कम वित्तीय कंपनीकडे वळती केली जाते.