ठाणे जिल्ह्य़ात प्रामुख्याने पाणीपुरवठा होणाऱ्या बारवी आणि आंद्र या दोन्ही धरणात जेमतेम असलेल्या जलसाठय़ाचे अधिक काटेकोरपणे नियोजन व्हावे, यासाठी आता संपूर्ण जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा शनिवार-रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक शहरात निरनिराळ्या दिवशी पाणीकपात सुरू आहे. त्यात अधिक सुसूत्रता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, आठवडय़ातील दोनऐवजी तीन दिवस पाणी बंदीचे संकट मात्र तूर्त टळले आहे. येत्या सहा ६ फेब्रुवारीपासून पाणीकपातीचे नवे वेळापत्रक लागू होईल.
बारवी व आंद्र धरणात जेमतेम पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपातीत आणखी एका दिवसाची वाढ करण्याबाबत लघु पाटबंधारे खात्याने शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. परंतु तीन दिवस पाणीकपात करण्याऐवजी संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ात शनिवार व रविवार असे दोन दिवस पाणीकपात करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. येत्या ६ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाणीकपातीत वाढ होणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बारवी धरणात ११५ द.ल.घ.मी. तर टाटा आंद्र धरणात ११० द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठी १५ जुलैपर्यंत पुरण्याची शक्यता कमी आहे.