सायबा क्रीडानगरी, मनीषानगर, कळवा

सकाळी लवकर उठून स्वत:साठी अध्र्या-एक तास दिला की तुमचा दिवस छान जातो, असे म्हणतात. अनेक वैद्यकीय व्यावसायिक, मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांना हा सल्ला आवर्जून देत असतात. त्यामुळे हल्ली बरेच जण रामप्रहरी फेरफटका मारायला जातात. कळव्यातील मनीषानगर येथील सायबा क्रीडानगरीमध्येही सकाळी अनेक जण व्यायाम, फेरफटका मारताना दिसतात. आरोग्याची काळजी घेतानाच सकाळच्या रामप्रहरी मैत्रीचे सूर जुळलेले अनेक जण येथे गप्पांच्या मैफलीही जमवितात..

आजकाल धकाधकीच्या जगात आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. स्वत:साठी थोडा वेळ काढत असतो. कुणी चालायला जातात तर कुणी योगसाधना करतात. सकाळच्या शांत प्रहरी चालणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे असते. कळवा, मनीषानगर येथे राहणाऱ्या बऱ्याच जणांची पावले सायबा क्रीडानगरी येथे वळतात. थोडा व्यायाम करतात, विसावा घेतात. प्रभातसमयी जोडलेल्या सन्मित्रांसोबत हितगुज करतात. अशा प्रकारे सुरुवात चांगली झाली की पुढे संपूर्ण दिवस चांगला जातो.

त्यानंतर आपला दिवस आनंदात जावो अशा एकमेकांना शुभेच्छा देऊन आपापल्या कामाला जातात. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी भेटण्याची ओढ शरीराला आणि मित्रांनाही लागते. गेली २५ वर्षे त्यांचा हा शिरस्ता सुरू आहे. सुरुवातीच्या काळात या मैदानाचा फक्त खेळण्यासाठीच वापर केला जात होता. कालांतराने येथे वस्ती वाढत गेली. त्यानंतर परिसरातील नागरिक येथे पहाटेच्या प्रहरी चालायला येऊ लागले. पूर्वी या मैदानावर कोणतीही सोय नव्हती. मात्र हळूहळू येथे चालण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आला. या ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सध्या या मैदानात रोज सकाळ-संध्याकाळ जुनी गाणी लावली जातात. त्यामुळे जुन्या गाण्यांचे सूर आणि आरोग्य या दोन्हीची मैफल येथे छान रंगते.

येथे जवळच मनीषानगर महाविद्यालय असल्याने तेथील विद्यार्थीही मैदानात सकाळी गर्दी करतात. मैदानाच्या एका कोपऱ्यात बसून शांतपणे अभ्यास करता येतो, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. मैदानातील स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. नेहमीच हा सर्व परिसर टापटीप असतो. मात्र सध्या पावसाळा असल्याने या उद्यानामध्ये फारच गवत उगवले आहे. त्यामुळे हे गवत लवकरात लवकर काढावे नाही तर पायाखाली एखादा साप, विंचू येण्याची शक्यता असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पहाटे साडेपाच वाजता येथे हास्य क्लबचेही वर्गही भरतात. या हास्य क्लबमध्ये सध्या नियमितपणे १५ जणांचा समावेश आहे. योगाचेही वर्ग येथे चालविले जातात. शुद्ध श्वास घेता यावा, यासाठी या उद्यानात वेगवेगळ्या सुगंधी फुलांची झाडे लावली आहेत. त्यामध्ये चमेली, जाई, जुई, तगर अशी झाडे आहेत. त्यामुळे ही फुले बहरलेली बघून संपूर्ण दिवस अगदी छान बहरलेला जातो.  मात्र काही नागरिक येथे येऊन बहरलेली फुले तोडतात अशी नागरिकांची तक्रार आहे. सकाळी अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन येथे येत असतात. महाविद्यालयातील विद्यार्थी खाण्याचे पदार्थ घेऊन येतात आणि कचरा येथेच फेकतात. त्यामुळे या स्वच्छ मैदानाला अस्वच्छतेचे गालबोट लागते. याशिवाय उगाच टाईमपास म्हणून मैदानात रेंगाळणाऱ्या अनाहूत माणसांना येथे येण्यास मज्जाव करावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. या उद्यानात ओपन जिमची सुविधा आहे. विशेष म्हणजे या सुविधा वापरण्याजोग्या अवस्थेत आहेत. या जिमचा लाभ सकाळी अनेक जण घेताना दिसतात. मन प्रसन्न राहावे, आपल्या शरीरावर आपला ताबा असावा हा प्रभातफेरीचा मुख्य उद्देश. तो इथे येऊन साध्य होतोच, शिवाय पहाटेच्या या रपेटीने अनेकांना चांगले मित्र मिळाले आहेत. त्यामुळे एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण जर आली नाही तर चुकल्यासारखे वाटते, असेही अनेक जणांनी सांगितले. उद्यानात पिण्याच्या पाण्याची मात्र चांगली सोय नाही. त्यामुळे उन्हाळ्यात त्रास होत असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या. या मैदानात अनेक खेळांचे आयोजन केले जाते. मैदानाच्या मधोमध खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. येथे खेळाडूही सकाळी धावणे, क्रिकेट, बॅडमिंटन आदींचा सारव करताना दिसतात. या उद्यानात बसण्यासाठी पाच ते सहा ठिकाणी तंबू उभारले आहेत. त्यामुळे पाऊस आला तरीही या तंबूंचा आसरा मिळतो, असे नागरिकांनी सांगितले. बसण्यासाठी येथे बाजूने कट्टेही करण्यात आले आहेत. त्यामुळे कट्टय़ावर बसूनही अनेक जण व्यायाम करतात. या उद्यानाच्या बाहेर लागूनच साईबाबांचे मंदिर आहे. त्यामुळे चालणे-फिरणे झाले की अनेक जण या देवळात जाऊनही विसावतात.

दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते..

आरोग्यासाठी व्यायाम करायला येतो. दीड-दोन वर्षे या उद्यानात नियमितपणे येत आहे. या मैदानातील व्यवस्था उत्तम असल्याने आरोग्यही उत्तम राहते. जरा चालले की स्वत:लाच बरे वाटते. दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. या मैदानाला दोन ते तीन गोल फेऱ्या मारतो. त्यामुळे दररोज साधारणत: एक किलोमीटर अंतर चालतो.

– विजय पिंपळे, कळवा

लवकर उठायची सवय लागते..

सकाळी लवकर उठायची सवय लागते आणि शरीरालाही शिस्त लागते. मैदानात शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरण असल्याने या मैदानात येऊनच व्यायम करतो. फुलांचा सुगंधही येथे दरवळतो. त्यामुळे मन प्रसन्न राहते. योगसाधना केल्याने हात-पाय मोकळे होतात. दोन फेऱ्या उद्यानाच्या पूर्ण केल्या की जरा वेळ कट्टय़ावर विसावतो. कट्टे स्वच्छ असतात. उन्हाळा तसेच दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलेही बालोद्यानात सायंकाळी खेळताना दिसतात.

– मुकुंद वैद्य, कळवा

ओपन जिमची व्यवस्था उत्तम..

येथील ओपन जिमची व्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे महिलांनाही येथे व्यायाम करणे सोपे जाते. कधी काही सुविधा खराब झाल्यास त्या तोबडतोब सुधारल्या जातात. नगरसेवक मनोहर साळवी येथे नित्यनेमाने ५ ते ६.३० पर्यंत आरोग्य जपण्यासाठी फेऱ्या मारतात. त्यामुळे येथील व्यवस्थेकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. आरोग्य जपण्यासाठी रोज सकाळी उठून येते.

– अंजली शेगावकर, कळवा

व्यायाम केल्याने दिवस आनंदी जातो..

या मैदानातील गवत लवकरात लवकर काढावे, अन्यथा साप येण्याची भीती आहे. बाकी आरोग्य जपण्यासाठी या मैदानाची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. येथे यायला लागल्यापासून अनेक मैत्रिणी भेटल्या आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन झाली की १५ मिनिटे तरी एकमेकांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात सहज निघून जातात. त्यानंतर मग पुन्हा थोडा जिमच्या साधनांचा आधार घेऊन व्यायाम केला की दिवस कसा छान आनंदात जातो.

– लता थोरात, कळवा