ठेकेदारांवर महापालिकेची खरात; कंत्राटात लाखो रुपयांची वाढ
वसइ-विरार महापालिकेने शहरातील साफसफाई करण्याच्या कामाच्या नवीन निविदा अद्याप काढलेल्या नसून जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ देताना मात्र त्यांनी ठेक्याच्या दरात दुपटीने वाढ केली आहे. प्रभाग ‘आय’मध्ये मासिक ४७ लाख रुपयांनी दिलेल्या ठेका तब्बल ७९ लाख रुपयांनी वाढवून दिला आहे. यामुळे वार्षिक पावणेचार कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसला आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे.
वसई-विरार महापालिकेमार्फत खासगी ठेकेदारांना शहरातील कचरा उचलणे, रस्त्यांची साफसफाई करणे आदी कामांसाठी निविदा काढून ठेका दिला जातो. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ठेका दिला जातो. परंतु अनेक वेळा ठरावीक ठेकेदारांचेच वर्चस्व त्यात दिसून येत असते. सध्या पालिकेने नवीन ठेका न काढता जुन्या ठेकादारांना मुदतवाढ दिली होती. वसईच्या प्रभाग समिती आयमध्ये देण्यात आलेल्या ठेक्यात अचानक मासिक ३२ लाख रुपयांची वाढ केलेली आहे. म्हणजेच वार्षिक ३ कोटी ८८ लाख रुपये अतिरिक्त रकमेने या ठेक्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी वसई भाजपचे अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी पत्रात केली आहे.

* २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन आर्थिक वर्षांत एका दराने मासिक ४७ लाख ५० हजार रुपयांनी साफसफाईचा ठेका देण्यात आलेला होता.
* २०१४-१५ या वर्षांत अचानक ७९ लाख ८४ हजार रुपयांनी ठेक्याला मुदतवाढ देण्यात आली.
* प्रभागातील जो कचरा ४७ लाख रुपये खर्च करून उचलला जात होता, तोच कचरा उचलायला आता ७९ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे.
* यामुळे एकाच प्रभागात पालिकेला ३ कोटी ८८ लाख रुपये एवढा भरुदड बसत आहे.

भ्रष्टाचार झाल्याचे आरोप चुकीचा आहे. मुदतवाढ देऊन सुधारित दर नियमाप्रमाणे दिले आहेत. ठेकेदार किती कर्मचारी लावणार आहे, त्यांना वाहन, साहित्य काय पुरविणार आहे. त्यावर हा दर ठरत असतो. तशा सर्व कागदपत्राच्या आधारे सुधारित दर देण्यात आला आहे. यानंतर लवकरच नवीन निविदा काढल्या जाणार आहे.
– अजिज शेख, पालिकेचे उपायुक्त

मेसर्स शिवम एण्टरप्रायझेसने १ सप्टेंबर २०१४ रोजी कचरा उचलण्याचा ठेका घेतला होता. मात्र २७ ऑक्टोबरमध्ये त्यांचे ८२ कायम कर्मचारी अन्य ठिकाणी पाठविण्यात आले. मग या ५६ दिवसांच्या कालावधीत हे कर्मचारी कुठे काम करीत होते? सफाईच्या कामात निविदा न काढता मुदतवाढ देणे आणि त्यांना दुपटीने दर मंजूर करणे या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. ही परिस्थिती केवळ एका प्रभागाची आहे. पालिकेच्या अन्य प्रभागांतही अशाच पद्धतीने कारभार चालत असून पालिकेला कोटय़वधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.
– मारुती घुटुकडे, अध्यक्ष, वसई भाजप