शिक्षण विभागाकडून आयसीटी अभ्यासक्रमात समावेश
‘सेल्फी’ काढताना वांद्रे-बँडस्टँडच्या समुद्रात पडून अपघात..नाशिकमध्ये सेल्फी काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू तर सेल्फीच्या नादात नाहूरजवळ ओव्हरहेड वायरच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू..मोबाइलमध्ये गुंतून गेल्याने तरुणाईचे सुटलेले भान धोकादायक ठरू लागले आहे. तर दुसरीकडे सोशल माध्यमांच्या साहाय्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्या आहेत. या परिस्थितीत शालेय अभ्यासक्रमांतून दिला जाणारा माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम कालबाह्य़ ठरू लागला आहे. त्यामुळे मुलांना शालेय अभ्यासक्रमांमध्ये ‘सायबर सुरक्षा’चे धडे देण्यासाठी ‘डिजिटल आणि सेफ ठाणे’च्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाला राज्याच्या शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून माहिती व संपर्क तंत्रज्ञानच्या (आयसीटी) अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
मोबाइलमग्न तरुणाईला त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देत डिजिटल जगामध्ये वावरताना घ्यायची सुरक्षा आणि काळजी याचे धडे ‘डिजिटल आणि सेफ ठाणे’ उपक्रमाच्या माध्यमातून ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ ही चळवळ देत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे पोलिसांच्या मदतीने शहरातील वायफायच्या सुरक्षेचा अभ्यास करण्यात आला होता. वायफाय सुरक्षित करण्याबरोबरच त्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठीही जनजागृती संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू केले होते. चळवळीतील मानसोपचारतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर यांच्या मदतीने सुरक्षेचे उपाय आणि घ्यायची काळजी याची एक नियमावली तयार करण्यात आली होती. यापूर्वी शालेय स्तरावर शिकवला जाणारा माहिती तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कालबाह्य़ होऊ लागला असल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या सूचना आणि उपायांचा समावेश त्यात करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नेटिझन चळवळीच्या वतीने प्रयत्न सुरू होते. अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने हा अभ्यासक्रमाचा समावेश माहिती व संपर्क तंत्रज्ञान अर्थात आयसीटीच्या अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात सुरू असलेल्या या चळवळीला आता क्विक हिल फाउंडेशन या संस्थेनेही आर्थिक पाठबळ दिले असून या माध्यमातून ठाण्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थी पालकांपर्यंत ही चळवळ पोहोचवली जाणार आहे.

‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’चा दुसरा टप्पा..
शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षा पोहोचवण्याच्या दृष्टीने शहरातील ३० शाळांमध्ये रिस्पॉन्सिबल नेटिझनचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील सेंट जॉन द बाप्तिस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी, शिक्षण अधिकारी मीना यादव, क्विक हिल फाउंडेशनचे अजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.