थोडासा वेळ वाचविण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता रेल्वेचे रूळ ओलांडणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लहानग्यांनी सुरक्षेची राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात हा अनोखा उपक्रम राबवून प्रवाशांना संदेश दिला. बदलापूर रेल्वे स्थानकात अनेक दिशेने रेल्वे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून येत असतात. थोडा वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी अनेक प्रवासी या जीवघेण्या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन त्यात शेकडोंना आपले जीव गमवावे लागले होते.

याबाबत जनजागृती करण्यासाठी योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांना विविध संदेश देणाऱ्या राख्या बांधल्या. त्यात चालत्या रेल्वेत चढू अथवा उतरू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका असे संदेश लिहिले होते. या उपक्रमात ज्येष्ठ, तरुण, विद्यार्थी आणि महिलांनाही या संदेश देणाऱ्या राख्या बांधण्यात आल्या. यावेळी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक नारायण शेळके, पोलिस दलातर्फे एस पी सिंग, शिवशरण प्रसाद, गणेश महाजन आणि इतर रेल्वे पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते.

या वेळी रूळ ओलांडत असलेल्या प्रवाशांना सुरक्षेचा संदेश दिल्यानंतर रेल्वे पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत होते. योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेतर्फे अजित इरमाळी, सुनील राऊत, अनुराधा मोकड हे शिक्षक सहभागी झाले होते. यासह शनिवारी योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतर अनेक सामाजिक संस्थांना भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. त्यात इयत्ता ५वी आणि ६वी च्या विद्यार्थ्यांनी प्रगती अंध विद्यालयास भेट देत रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांच्यात एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होईल, असे हर्षला कुलकर्णी यांनी सांगितले.