शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजची पिढी विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून अधिक नेमकेपणाने ज्ञानार्जन करूशकते, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मराठा मंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. मराठा मंडळातर्फे नौपाडय़ातील सरस्वती मराठी शाळेत दहावी, बारावीमध्ये ८० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जोशी- बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यावेळी उपस्थित होत्या.
नेहमी स्वत:शी प्रामाणिक राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना देत मुलगी शिकली तर सारे कुटुंब सुस्थितीत आणू शकते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेतीची असली तरी मुलींना शिकवा, त्यांचे शिक्षण पैशांअभावी अपूर्ण राहू देऊ नका अशी विनंती डॉ. संजय देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना केली. कौतुक केल्याने कामाचे चीज होते, परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. अभ्यासातील यशासोबत एखादी कला, हुन्नर, खेळ विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे, काही वेळा अपयश आले तर ते पचवून पुन्हा मोठी झेप घेण्यासाठी योग, प्राणायाम याची सतत जोड असणे आजच्या तणावयुक्त जगात गरजेचे आहे, असे मागदर्शन प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी विद्यार्थ्यांंना केले. मराठा मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या २०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.