सोळा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा भंगारात काढण्याऐवजी अनेक रिक्षाचालक ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांसमोर अशा रिक्षा भंगारात काढल्याचा फक्त देखावा करत आहेत. एखाद्या भंगार रिक्षाची तपासणी करायची आणि तिच्या नावावर अन्य तीन ते चार रिक्षांचा व्यवसाय करायचा असा प्रकार हे रिक्षाचालक अवलंबत आहेत. अशा चोरटय़ा रिक्षा मोठय़ा प्रमाणात कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर फिरत असल्याने वाहतूक कोंडी, प्रवासी-रिक्षाचालक वाद निर्माण होत असल्याचे समजते.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण, डोंबिवलीत नियमित रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची तपासणी केली तर असे चोरटे रिक्षाचालक आरटीओ अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडणार आहेत. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांकडून महिनोन्महिने तपासणी होत नसल्याने असे बेकायदा व्यवसाय करणारे रिक्षाचालक व्यवसाय करीत असल्याची माहिती एका जाणकाराने दिली.
वाहतूक पोलिसांना फक्त वाहतूक नियोजनाचे अधिकार आहेत. वाढीव भाडे, रिक्षातील चौथे आसन, रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासण्याचे अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना आहेत. आरटीओ कार्यालयाने एक अधिकारी, कर्मचारी जरी कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षा तपासणीसाठी वाहतूक विभागाला उपलब्ध करून दिला तरी बेकायदा रिक्षाचालकांना पकडणे शक्य होईल, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.  

रिक्षाचालकांची चलाखी
एखादी रिक्षा वापरून सोळा वर्षे झाली असतील तर ती रिक्षा ‘आरटीओ’ कार्यालयात नेली जाते. तेथे ती रिक्षा ‘आरटीओ’ अधिकारी ‘भंगार रिक्षा’ म्हणून तिची पंचांसमक्ष मोडतोड करतात. या प्रक्रियेला आरटीओ कार्यालयात ‘पलटी’ मारणे असे म्हटले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून चलाख रिक्षाचालक रिक्षा वापरून सोळा वर्षे झाली असली तरी आपली मूळ रिक्षा आरटीओ कार्यालयात भंगार करण्यासाठी नेत नाहीत. त्याऐवजी एखादी जुनीपुरानी रिक्षा आरटीओ कार्यालयात नेऊन उभी केली जाते. ती रिक्षा तेथे तोडली जाते. त्या रिक्षेचा परवाना नवीन रिक्षावर चढवण्यासाठी आरटीओ कार्यालय मंजुरी देते. म्हणजे मूळ भंगारात जाणारी रिक्षा ही कायम रस्त्यावर फिरत राहते. अशा प्रकारे एकाच वेळी दोन ते  तीन रिक्षा रस्त्यावर फिरू लागतात. अशी क्लृप्ती अनेक वर्षांपासून चलाख रिक्षाचालक वापरत आहेत. असे उद्योग करणाऱ्या रिक्षाचालकांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास वाहतूक, आरटीओ अधिकारी घाबरतात, असे समजते.

भुरटय़ांचे स्वतंत्र कार्ड
चोरटी रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकाजवळ एक विशिष्ट कार्ड असते. हे कार्ड म्हणजे रिक्षा चोरटी आहे. नियमित ‘लक्ष्मीपूजना’ची सोय केलेली आहे, अशी खूण असते. त्यामुळे वाहतूक पोलीस अशा रिक्षाचालकांना खुलेआम प्रवासी वाहतूक करण्यास मुभा देतात. अचानक आरटीओ अधिकारी तपासणीसाठी शहरात आले की मग असे रिक्षाचालक पळून जातात, अशी माहिती एका विश्वसनीय सूत्राने दिली. पलटी रिक्षा चोरून चालवण्यात येत असतील. तशी कोणी तक्रार केली आणि तपासणीत आढळून आल्या तर नक्कीच संबंधित रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्याने कारवाई केली जाईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.