पाण्याच्या खोलाचा तसेच गुणवत्तेचा पुरेसा अंदाज नसतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम ठाण्यातील विजय पटवर्धन आणि त्यांचे चिरंजीव कमलेश करीत आहेत. गेली ३२ वर्षे विजय पटवर्धन स्वत:ची नोकरी सांभाळून हे मदतकार्य करीत असून १९९३ मध्र्ये नागला बंदर खाडीत सापडलेला २६८० किलो आरडीएक्स स्फोटकांचा साठा बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनीच बजावली होती. मात्र, ठाणे शहरात अशा स्वरूपाची सेवा पुरविणाऱ्या पिता-पुत्रांची महापालिकेने दखलही घेतली नसल्याची बाब पुढे आली आहे.
ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणारे विजय पटवर्धन हे एका खासगी कंपनीत काम करतात. १९८१ साली महाविद्यालयात असतानाच त्यांनी पाणबुडय़ाचे प्रशिक्षण घेतले होते. पाणबुडय़ाचा छंद जोपासत असतानाच पुढे त्यांनी १९८२ सालापासून पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अशा कामांसाठी ते महापालिका अग्निशमन दल आणि पोलीस दलासही मदत करू लागले. त्यांच्यापाठोपाठ आता त्यांचा मुलगा कमलेश हासुद्धा अशा स्वरूपाचे काम करीत आहे. तो खासगी कंपनीतील नोकरी सांभाळून हे काम करीत आहे. रविवारी सायंकाळी उपवन तलावात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह या पिता-पुत्रांनीच पाण्याबाहेर काढले. त्यापैकी एकाचा मृतदेह ३० ते ३५फूट खोल अंतरावर सापडला होता. पाण्यात पडलेल्या वस्तू तसेच साहित्य बाहेर काढण्याचे काम हे पिता-पुत्र करतात. मात्र, या कामाची महापालिकेकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
ठाणे शहरातील विविध भागांतील विहिरी आणि तलावात बुडालेल्या अनेकांचे मृतदेह त्यांनी बाहेर काढण्याचे काम केले असून या कामासाठी त्यांनी स्वखर्चाने पाणबुडीचे साहित्य खरेदी केले आहे. त्याची किंमत सुमारे अडीच लाखांच्या घरात आहे. खासगी पाणबुडे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यासाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचे ५० ते ६० हजार रुपये घेतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्या तुलनेत पटवर्धन हे केवळ १५ ते २० हजार रुपये घेतात. पाणबुडय़ासाठी लागणारा गॅस आणि प्रदूषित पाण्यामुळे होणारे त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी खर्च येतो. त्यासाठी महापालिकेकडून इतके पैसे घेत असल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले. तसेच ठाण्यासह राज्यातील विविध भागांत अशा स्वरूपाची सेवा पुरवीत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडातील गंगेत उतरण्यास कोणीही तयार होत नाही. मात्र, तिथे पाणबुडय़ाच्या तीन तुकडय़ा तयार केल्या असून त्यापैकी एका तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ती मदतकार्य पोहचविणे सुरू झाले आहे. त्या तुकडीस मी प्रशिक्षण दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाण्याच्या खोलीचा तसेच गुणवत्तेचा पुरेसा अंदाज नसतो. तरीही स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम करतो. असे असतानाही या कामासाठी महापालिकेकडून कौतुकाची थाप मिळत नसल्याची खंत विजय पटवर्धन आणि त्यांचे पुत्र कमलेश यांनी व्यक्त केली. तसेच नागला बंदरातील खाडीतून स्फोटके बाहेर काढल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. तसेच काही वर्षांपूर्वी स्थायी समितीनी कामाचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.