शिवसेनेने आपल्या मित्रपक्षाची अर्थात भाजपची बिहारमधील मानहानीकारक पराभवावरून खिल्ली उडवली आहे. भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी लेटरबॉम्ब फोडला आहेच, पण अजूनही बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची बाकी आहे, असा खरमरीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचा महापौर होणारच होता मात्र, सगळ्यांनी मिळून विकास करावा म्हणून भाजपसोबत एकत्र आल्याचे उद्धव म्हणाले. कल्याणकरांच्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन देखील उद्धव यांनी यावेळी दिले. तसेच जाहिर सभेत वचन दिल्याप्रमाणे दुर्गाडी आणि डोंबिवलीला गणपती मंदिरात नगरसेवकांना घेऊन दर्शनाला जाणार असल्याचेही सांगितले. बिहार निवडणुकीबद्दल आणि त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. पण, बिहारमध्ये शिवसेनेला अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळाल्याचे उद्धव म्हणाले. जेडीयूचे नेते आणि बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीला जायचं की नाही, हे अद्याप ठरलेलं नाही, पण ते मुंबईत आले किंवा मी बिहारला गेलो की आम्ही जरूर भेटणार आहोत, असे सांगून उद्धव यांनी भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न केला.