शिवसेना गंजलेली तोटी..

दिल्लीत विकासाची विहीर भरली आहे.. राज्य सरकार पंपाच्या भूमिकेत आहे, तर आमदार म्हणजे वाहिनी आहे. त्यामुळे दिल्लीतील विकासाची गंगा कल्याण-डोंबिवलीतील आमदारांमार्फत शहरात अवतरेल, अशी व्यवस्था करा आणि जुनी, गंजलेली तोटी उखडून फेका, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेत्यांनी शिवसेनेचा उल्लेख थेट गंजलेली तोटी असा केला.

नक्की वाचा:- शिवसेनेचा भाजपला टोला

त्यानंतरही रविवारी दिवसभर शिवसेना नेते चिडीचूप असल्याचे चित्र दिसून आले. युतीसंबंधीची बोलणी अंतिम टप्प्यात येत नाहीत तोवर भाजपवर थेट प्रतिहल्ला टाळा, असे स्पष्ट आदेश स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
विकास परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा कल्याण-डोंबिवलीकरांपुढे सुमारे ६५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा मांडला. आचारसंहिता लागू असताना हा आराखडा मांडण्यात आल्याने यावरून नवे वादंग उठले असून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. या विकास परिषदेत भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे नाव न घेता या पक्षाचा उल्लेख थेट गंजलेली तोटी असा केला. विकासाची गंगा शहरात आणायची असेल तर ही तोटी बदला आणि नेमके पाणी कुठे मुरतेय याचा अभ्यास करा, असे आवाहन येथील मतदारांना करण्यात आले. भाजपचे नेते शिवसेनेवर असा थेट हल्ला चढवला. याच परिषदेत भाजपचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात विकास प्रकल्प मंजूर करून आणल्याचा उल्लेख केल्याने संतप्त झालेले शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मुद्दय़ावरून भाजपवर टीका केली खरी, मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक पॅकेजविषयी बोलण्यासाठी एकही शिवसेना नेता पुढे आला नाही.

सुभाष भोईर नाराज
भाजपच्या विकास परिषदेला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविल्याने शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. यासंबंधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपक साधला असता त्यांनी योग्य वेळ आल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली. आमदार भोईर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.