कल्याणमध्ये बुधवारी टोईंगवाल्यांच्या गाडीमागे धावताना हदयविकाराचा झटका येऊन एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे टोईंगवाल्यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याणच्या पश्चिमेकडील बाजारपेठ परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी मधुकर कासारे आपल्या मित्राला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी स्वत:ची दुचाकी पार्क केली आणि जवळच ते मित्राची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी या परिसरात टोईंग करणारे कर्मचारी अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी जप्त करत होते. टोईंग कर्मचाऱ्यांनी गाडी चुकीच्या ठिकाणी लावल्याचे कारण सांगत मधुकर कासारे यांची दुचाकी उचलली आणि पुढे जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच आपण गाडी पार्क नसल्याचे सांगत मधुकर कासारे दुचाकी जप्त न करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विनवणी करू लागले. मात्र, वाहतूक विभागात दंड भरून तुमची गाडी घेऊन, जा असे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी परत देण्यास नकार दिला. या दरम्यान, मधुकर कासारे सतत टोईंग व्हॅनच्या पाठीमागे धावत होते. धावत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते रस्त्यावर कोसळले. यानंतर त्यांना नजीकच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा, अशा प्राथमिक अंदाज यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केला. या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले.