तीन महिन्यांत ३ हजार ११० किलोमीटर अंतर पार; पोरबंदरला पदयात्रेची समाप्ती
चालण्याची खूप आवड असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे (६४) गेल्या तीन महिन्यांपासून देशाच्या पूर्व भागातील अरुणाचल प्रदेश ते पश्चिमेतील गुजरात (पोरबंदर) असा ३ हजार ७०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहेत. चालताना रस्त्यालगतच्या शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये जाऊन इंधन, पाणी वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा, प्रदूषणाचे उच्चाटन करा आणि सामाजिक समतेचा संदेश ते देत आहेत. गेल्या तीन महिन्याच्या काळात विद्याधर भुस्कुटे यांनी ३ हजार ११० किलोमीटर अंतर पायी कापले आहे. सध्या ते राजस्थानमधील उदयपूर येथून गुजरातच्या दिशेने कूच करीत आहेत.
तीन वर्षांपूर्वी भुस्कुटे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करून कापले होते. या पदयात्रेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या काळातही त्यांनी पर्यावरण संवर्धन, भ्रूण हत्या थांबवा, शांततेचा संदेश शाळा, संस्था, वाटसरूंना दिला होता. साठी ओलांडल्यानंतर एवढा प्रवास करणारे देशातील काही मोजक्या व्यक्तींपैकी आपण आहोत, असा दावा भुस्कुटे यांनी केला आहे.
चाळिसी ओलांडल्यानंतर अलीकडे बहुतेक व्यक्तींना विविध व्याधींनी ग्रासले जाते. डॉक्टरांकडच्या येरझऱ्या वाढतात. अशा परिस्थितीत ज्या जीवन पद्धतीत विद्याधर भुस्कुटे राहतात, ते मात्र या व्याधींवर मात करून आपल्या ठणठणीत शरीरयष्टीच्या जोरावर भारतभ्रमण करीत आहेत. प्रकृतीने साथ दिली तर भारत भ्रमंतीचा उपक्रम सुरूच राहील, असे भुस्कुटे यांनी उदयपूर येथील मुक्कामावरून ‘लोकसत्ता ठाणे’ला सांगितले.

फेब्रुवारी अखेर पोरबंदरला
विद्याधर भुस्कुटे हे डोंबिवलीतील एमआयडीसी भागात राहतात. ते बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. चालण्याची खूप हौस असलेल्या विद्याधर यांनी निवृत्तीनंतर फक्त ‘चालत राहा’ हाच छंद जोपासून चालण्याचे महत्त्व, त्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मागील वर्षी २६ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशातील किबीठू येथून भुस्कुटे यांनी पदयात्रेला सुरुवात केली. या महिन्याच्या अखेपर्यंत आपण पोरबंदर येथे पोहचणार आहोत. तेथे आपल्या पदयात्रेची समाप्ती होईल, असे म्हणाले. दररोज ते ३० ते ३५ किमी अंतर चालतात. वाटेत मिळेल ती शाळा, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण अशा ठिकाणी मुक्काम करुन ते रात्रीची विश्रांती घेतात. जगण्यासाठी काय लागते, हाही संदेश ते प्रवासात समाजाला देत आहेत. या प्रवासात भुस्कुटे यांना संतोष गरुडे, अरुण कुमार, चंद्रकांत कुलकर्णी हे सहकार्य करीत आहेत. विद्याधर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई भुस्कुटे (८५) व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत विठ्ठल भुस्कुटे यांचे चिरंजीव आहेत.