मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याच्या हालचालींना वेग आला असताना ठाणे शहरातील गर्दीच्या ठिकाणीही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. या स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी स्नानगृह, चेंजिग रूम उभारण्याचा विचारही पालिका प्रशासनाने चालवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने येणाऱ्या अडचणींची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मध्यंतरी सर्व महापालिकांना अशी स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र, याची ठाणे महापालिकेकडून तातडीने दखल घेण्यात आली नव्हती. ठाणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याच्या मुद्दय़ावर आता ओरड सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करा, असा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने महापालिका आयुक्तांसमोर ठेवला आहे. त्यानुसार महिलांकरिता दोन भारतीय आणि दोन पाश्चात्त्य प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातून मुंबई आणि अन्य ठिकाणी कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिलांची संख्या जास्त असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामावर जाणाऱ्या महिलांसाठी ठाणे स्टेशन परिसरात सुसज्ज असे स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. या स्वच्छतागृहामध्ये महिलांकरिता स्नानगृह, चेंजिंग रूम अशा सोयी असण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी पत्रकारांना दिली.