दोन जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर ; किसननगरात एकनाथ शिंदेंची शर्थ व्यर्थ, भाजप दोन्ही ठिकाणी तोंडघशी
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला जेमतेम सहा महिने उरले असताना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप या पक्षांना दोन जागांवरील पोटनिवडणुकीतील निकालाने इशारा दिला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या किसननगर भटवाडी परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्या समर्थक अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख यांनी विजय मिळवला. तर विटाव्याची जागा जिंकत शिवसेनेने भाजपला धूळ चारली. विशेष म्हणजे, या दोन्ही पक्षांनीच ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने या निकालाने शिवसेनेला धक्का तर भाजपला मोठा हादरा दिल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत माजी नगरसेवक राजा गवारे याने शिवसेनेत प्रवेश केला होता. सहा महिन्यांपूर्वी एका खुनाच्या खटल्यात राजा गवारे याला शिक्षा झाल्यामुळे त्याचे नगरसेवकपद रद्द झाले. तसेच किसननगर भागातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले संजय घाडीगावकर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांकरिता पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत युतीची बोलणी फिस्कटल्याने शिवसेना-भाजप या मित्र पक्षांनी दोन्ही ठिकाणी एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते. ठाणे महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून भाजपने या दोन्ही प्रभागांत मोठी ताकद लावली होती. पक्षाचे नवे राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही या भागात तळ ठोकून होते. मात्र, या दोन्ही प्रभागांत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने स्थानिक पातळीवर पक्षाच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.
भटवाडीचा परिसर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या प्रभागात शिंदे यांनी सभांचा धडाका लावला होता. मात्र, या प्रभागात अपक्ष स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या संगीता घाग यांचा १९४ मतांनी पराभव केल्याने शिंदे यांच्या राजकीय वर्चस्वालाच प्रश्नचिन्ह लागले आहे. या प्रभागात काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांची स्वतचे वर्चस्व सिद्ध केले आहे. घाडीगावकर यांनी सुचविलेल्या उमेदवाराला तिकीट नाकारून काँग्रेसने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

विटाव्यात शिवसेनेची सरशी
कळव्यातील विटावा प्रभाग क्रमांक ५३ (अ) चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामध्ये शिवसेनेच्या पूजा करसुळे, भाजपच्या कल्पना गायकवाड, काँग्रेसच्या सुनंदा कोकणी आणि अपक्ष राजेश वाघ या उमेदवारांचा समावेश होता. या प्रभागात शिवसेना विरुद्घ भाजप असा सामना रंगल्याने ही अटीतटीची लढत होईल असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेच्या पूजा करसुळे यांनी भाजपच्या कल्पना गायकवाड यांचा १८८५ मतांनी पराभव विजय संपादन केला.

शिवसेना-भाजपच्या मतविभागणीमुळे भटवाडी-किसननगर निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झालेला नाही. या निवडणुकीत आम्ही प्रचारात कमी पडलो. त्यामागच्या कारणांचा शोध घेऊ. तसेच या निकालांनुसार आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल.
– संजय मोरे, महापौर